‘नागवडे’ कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला
14 जानेवारीला मतदान तर 15 जानेवारीला मतमोजणी । 19 हजार 841 पात्र सभासद
श्रीगोंदा । वीरभूमी- 10-Dec, 2021, 08:04 AM
सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना नूतन संचालक मंडळाची निवडणूक राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दि.9 रोजी काढलेल्या आदेशानुसार जाहीर केली आहे. दि. 13 डिसेंबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार असून शुक्रवार दि.14 जानेवारी रोजी मतदान होणार आहे तर दि.15 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मोजणीनंतर त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे.सध्या अस्तित्वात असलेल्या संचालक मंडळाची मुदत एप्रिल 2020 रोजी संपली होती. मात्र देश व जगभरात आलेल्या भयंकर कोविड महामारीमुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याने या संचालक मंडळाला जवळपास पावणे दोन वर्ष अधिकची सत्ता मिळाली.
एकूण 21 जागांसाठी असलेली निवडणूक सर्वसाधारण मतदार संघात श्रीगोंदा, काष्टी, कोळगाव गटात प्रत्येकी 2 व बेलवंडी, टाकळी कडेवळीत, लिंपणगाव गटात प्रत्येकी 3 प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत. सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था, पणन संस्था मतदार संघातून 1 प्रतिनिधी, अनुसूचित जाती-अनु-जमाती मतदार संघातून 1 प्रतिनिधी, महिला मतदार संघ 2 प्रतिनिधी, इतर मागास प्रवर्गातून 1 प्रतिनिधी, भटक्या विमुक्त जाती-जमाती, विशेष मागास प्रवर्गातील 1 प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत.
एकूण 19,841 पात्र सभासद मतदार नूतन 21 जणांचे संचालक मंडळ निवडणार आहे. नामनिर्देशन पत्र दि. 13 डिसेंबर पासून दाखल करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी दि.20 रोजी तर विधिग्राह्य नामनिर्देशन सूची दि. 21 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. नामनिर्देशन मागे घेण्याची मुदत 21 डिसेंबर ते 4 जानेवारी पर्यंत आहे. अंतिम उमेदवार यादी व निशाणी किंवा चिन्ह वाटप दि. 5 जानेवारी रोजी होणार आहे. एकूण 8 दिवसांच्या प्रचार कालावधीनंतर दि.14 रोजी प्रत्यक्षात मतदान घेण्यात येऊन दि.15 रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी पूर्ण झाली की त्याचवेळेस निकाल जाहीर घोषित केला जाणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीगोंदा-पारनेरचे उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांची नियुक्ती केली आहे. मतदान केंद्र व मतमोजणी स्थळ निवडणूक निर्णय अधिकारी नंतर जाहीर करणार आहेत.
1984 चा अपवाद वगळता 1970 सालापासून आजतागायत ‘नागवडे’ कारखाना स्व. शिवाजीराव (बापू) नागवडे यांच्या ताब्यात आहे. बापूंच्या निधनानंतर चिरंजीव राजेंद्र नागवडे यांच्याकडे कारखान्याची सूत्रे आली. पारंपारिक विरोधक माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडे 1984 साली सत्ता आली. परंतु काही संचालक फुटल्याने काही महिन्यांतच बबनरावांचे सह्याचे अधिकार काढून घेऊन ते नाममात्र चेअरमन राहिले. त्यानंतर सलग नागवडे कुटुंबीयांकडे कारखान्याची सत्ता राहिली.
पाचपुते यांनी खाजगी साखर कारखानदारीत उडी घेतली. परंतु काही वर्षातच अडचणीत आल्याने कारखाना बंद पडला. पाचपुते आज जरी आमदार असले तरी सहकार व खाजगी कारखानदारीत अपयश, वय, आरोग्य समस्या यामुळे पॅनल उभा करणार की नाही? हे येत्या काही दिवसात कळेल. बापूंचे खंदे सहकारी माजी उपाध्यक्ष केशवराव मगर यांनी राजेंद्र नागवडे यांच्याविरोधात बंड पुकारले आहे. मगर पॅनल उभा करणार आहेत, हे निश्चित मानले जाते.
पाचपुते यांचे मोठे पारंपरिक मतदार आहेत. बिनविरोध निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले आहे. परंतु मगर यांची भूमिका महत्त्वाची राहणार असून पाचपुते कुणाच्या पारड्यात छटाकी वजन टाकणार आहेत हे पाहणे औतूसक्याचे ठरणार आहे.
Comments