कर्जत तालुक्यातील कोरोना विधवांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घ्यावा ः आशिष बोरा
कर्जत । वीरभूमी - 10-Dec, 2021, 01:09 PM
कोरोना काळात कर्जत तालुक्यातील विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी मतदारसंघात पुढाकार घ्यावा. यासह विधवा महिलांना राज्य सरकारने एकरकमी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी तसेच रोजगारासाठी स्वतंत्र्य योजना जाहीर करत कमी व्याजदराने कर्ज देण्याची तरतूद करावी या आशयाचे निवेदन कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे कर्जत तालुका समन्वयक आशिष बोरा यांनी आ. रोहित पवार यांना दिले. यावेळी राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष प्रा विशाल मेहत्रे, पत्रकार डॉ. अफरोजखान पठाण उपस्थित होते.
सदर निवेदनात कोरोना काळात कर्जत तालुक्यातील विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी मतदारसंघात एक महत्वकांक्षी योजना राबविण्यात यावी. जेणेकरून त्या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊन त्यांच्या कुटुंबियासाठी मोठा आधार निर्माण होईल. यासह कोरोनाच्या दुसर्या लाटेत जे मृत्यू झाले. त्यात तरुणांची संख्या मोठी होत.
यातील अनेक जण असंघटित क्षेत्रातील होते. त्यांच्या दवाखान्यातील खर्चाने अनेक कुटुंब कर्जबाजारी झाले आहेत. या कुटुंबांना मदतीची गरज आहे. आपण पुढाकार घेऊन आपल्या मतदारसंघात या कुटुंबांचे पुनर्वसन करावे. विधवा महिलांना राज्य सरकारने एकरकमी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी व त्यांच्या रोजगारासाठी स्वतंत्र्य योजना जाहीर करावी. त्यात कमी व्याजदराने कर्ज देण्याची तरतूद करायला हवी.
यासाठी आपण विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करावा. आसाम, बिहार, केरळ, दिल्ली आणि राजस्थान सरकारने या विधवा महिलांसाठी 1 ते 4 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली आहे. महाराष्ट्र सरकारने देखील महिलांसाठी किमान 2 लाख तात्काळ द्यावे यासाठी मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधावे. ‘कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती’ ही महाराष्ट्र स्तरावरील या महिलांना मदत करण्याचे काम करते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत समितीची बैठक झाली असून धोरणात्मक निर्णय होण्यासाठी समिती प्रयत्न करत आहे.
आपण मतदारसंघातील अशा महिलांचे सर्वेक्षण करून या महिलांचा एक मेळावा घ्यावा. या मेळाव्यात त्यांच्या रोजगारासाठी पुढाकार घेत रोजगाराची साधने उपलब्ध करुन द्यावीत. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने वात्सल्य समिती स्थापन केली आहे
परंतु महाराष्ट्रात या समित्यांच्या बैठक फार होत नाही. तहसीलदारांनी प्रत्येक आठवड्याला बैठक घ्यावी जेणेकरून पाच विधवा महिलांचे उमेदच्या माध्यमातून बचत गट तयार करावे. आणि या मार्फत त्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करावे. ज्या कुटुंबावर अथवा महिलावर कर्ज असेल ते माफ व्हावे. यासाठी उपाययोजना करावी.
अनेक विधवा झालेल्या महिलांना सासरची मंडळी मालमत्तेचा अधिकार नाकारत आहे अशा महिलांना हक्क मिळवून देण्यासाठी मदत करावी या आशयाचे निवेदन समन्वयक आशिष बोरा यांनी आ. रोहित पवार यांना गुरुवारी कर्जत येथे दिले.
Comments