शेवगाव । वीरभूमी - 10-Dec, 2021, 01:15 PM
महावितरणने थकीत वीज बिलासाठी खंडीत केलेला तालुक्यातील कृषी पंपाचा वीज पुरवठा त्वरीत सुरळीत करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने जोहरापूर येथील ढोरानदी पात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले.
जलसमाधी आंदोलनासाठी पदाधिकारी उतरताच महावितरणच्या अधिकार्यांनी वरीष्ठ अधिकार्यांशी चर्चा करुन 14 फिडरवरील रोहीत्र तात्पुरत्या स्वरुपात सुरु करुन कृषी पंपाचा वीज पुरवठा त्वरीत सुरळीत केला. तसेच इतर मागण्यांचे उपअभियंता एस. एम. लोहारे यांनी लेखी आश्वासन देताच आंदोलन स्थगीत करण्यात आले.
थकीत बिलाच्या वसुलीसाठी महावितरणने शेवगाव तालुक्यातील कृषी पंपाचा गेल्या 20 दिवसापासून वीजपुरवठा खंडीत केला होता. विहीरी व कुपनलिकांना मुबलक पाणी असतांना तसेच रब्बी हंगामासाठी तयारी असतानांच महावितरणने वीजपुरवठा खंडीत केल्याने शेतकर्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
यामुळे पिके हातून जाण्याच्या मार्गावर आहेत. अशा अडचणीच्या परिस्थितीत महावितरणने योग्य तोडगा काढून तालुक्यामध्ये इतर तालुक्यासारखा वीजपुरवठा सुरळीत करुन शेतकर्यांना दिलासा द्यावा. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने आज गुरुवारी शेवगाव तालुक्यातील जोहरापूर येथील ढोरानदीमध्ये पदाधिकारी व शेतकर्यांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या संदर्भात तहसिलदार, महावितरणचे अधिकारी, पोलीस अधिकारी व आंदोलनकर्ते यांच्यामध्ये तहसिल कार्यालय व पोलीस ठाण्यात बैठक घेवून तो़डगा काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र वीजपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात तोडगा न निघाल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने नदीमध्ये जलसमाधी आंदोलन करण्यावर ठाम राहीले. जलसमाधी आंदोलनासाठी संजय नांगरे, दत्तात्रय फुंदे, भाऊ बैरागी हे पदाधिकारी नदीमध्ये उतरताच महावितरणचे अधिकारी नरमले.
त्यांनी वरीष्ठ अधिकार्यांशी चर्चा करुन पुरग्रस्त 14 फिडरवरील शेतीपंपाचा वीज पुरवठा तात्पुरता सुरु करण्यात येईल, पुरग्रस्त भागातील बाधीत शेतीपंप रोहीत्रावरील ग्राहकांना त्यांच्या अर्जानुसार सवलत देण्यात येईल, शेतीपंप रोहीत्रावरील 80 टक्के ग्राहकांनी वीज बील भरल्यास रोहीत्र चालू करण्यात येतील, कृषी पंपधोरण 2020 अंतर्गत 66 टक्के पर्यंत सवलत, स्थानिक विकास निधी, नवीन कोटेशन बाबत जास्तीत जास्त जनजागृती करण्यात येईल
तसेच इतर मागण्यांसदर्भात वरीष्ठ कार्यालयास कळविले असून वरीष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही करता येईल, असे महावितरणचे उपअभियंता एस. एम. लोहारे यांनी संजय नांगरे, दत्तात्रय फुंदे, भाऊ बैरागी या पदाधिकार्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अरुण लांडे, अॅड. सुभाष लांडे, संजय पांडव, माऊली कराड, रामभाऊ काळे, संजय लांडे, अक्षय कराड, दिपक कबाडी, अशोक सोलट, आदिनाथ हरवणे, विकास साबळे आदींसह शेतकरी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Comments