शेवगाव । वीरभूमी - 10-Dec, 2021, 01:23 PM
महावितरण कंपनीने शेवगाव तालुक्यातील शेतकर्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केल्याने शेतकर्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान होत आहे.
महावितरण कंपनीने कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम त्वरीत थांबवावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांनी दिला आहे.
याबाबत शेवगाव येथील विज वितरण कंपनीच्या कार्यालयात सुमारे 1 तास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी महावितरण कंपनीचे उपअंभियता यांना निवेदन देऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी धारेवर धरले.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे शेतीमालाची विक्री करण्यासाठी चांगले बाजारभाव मिळाले नाहीत. परिणामी शेतकर्यांची मोठी आर्थिक हानी झाली. शेवगाव व परिसरातील नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे त्यावर अनेक कुटुंबियांची उपजीविका चालते. शेवगाव परिसरातील बाजारपेठेचे अर्थकारण शेती व्यवसायावर अवलंबून आहे.
सध्या रब्बी हंगाम सुरू असून शेतकर्यांनी हरभरा, गहू, मका ही पिके शेतामध्ये पेरली आहेत. तसेच परिसरात ऊस, पेरू, चिकू, डाळिंब, आंबा, सिताफळ या फळबागा मोठ्या प्रमाणावर आहेत. लॉकडाऊननंतर शेतीमालाला चांगल्याप्रकारे भाव मिळेल या हेतूने रब्बी हंगामासाठी शेतकर्यांनी पैशाची जुळवाजुळव करून शेती मशागत व बियाणे खरेदी करून शेतामध्ये रब्बी पिकांची पेरणी केली असून बियाणे उगवण्यासाठी शेतकर्यांची दिवस रात्रीची पर्वा न करता शेतीमालाला पाणी देण्याचे काम करीत आहे.
शेवगाव परिसरात जवळपास 60 टक्के रब्बी पेरणी झाली असून पिके जगविण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज असताना महावितरण कंपनीने रोहित्र बंद करण्याचे काम सुरू केले आहे. लॉकडाऊनमध्ये आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी महावितरण कृषी पंपाची करीत असलेल्या सक्तीची वसुलीमुळे पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. पाण्याअभावी शेतामध्ये केलेली रब्बीची पेरणी वाया जाते की काय, अशी भीती शेतकर्यांना वाटू लागली आहे.
महावितरण कंपनीने सुरू केलेली सक्तीची वीज वसुली त्वरित थांबवली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आला आहे. यावेळी उपजिल्हाध्यक्ष गोकुळ भागवत, रामेश्वर बलिया, देविदास हुशार, ज्ञानेश्वर कुसळकर, सागर आधाट, बाळा वाघ, संदिप देशमुख, विकास भागवत, गणेश डोमकावळे, गणेश भागवत, साईनाथ बलिया, गोरख कौसे, सुभाष लोंखडे, रामदास डाके, बाळासाहेब भागवत, अप्पासाहेब वीर,
संजय वेताळ, सचिन बेळगे, दिपक बलिया, गोरख भागवत, राम बलिया, सुरेश सूर्यवंशी, आदर्श लोखंडे, मच्छिंद्र भडके, अमिन सय्यद, विठ्ठल दुधाळ, निवृत्ती आधाट, हर्षल नांगरे, संजय वणवे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
sgakBqmiHQJywp