पाथर्डीत दोन घरांवर दरोडा । हजारोंचा मुद्देमाल लुटला
पाथर्डी । वीरभूमी- 10-Dec, 2021, 01:32 PM
पाथर्डी शहरातील शेवगाव रोडवरील चितळे वस्तीवर लिंबाजी चितळे यांच्या घरावर आज शुक्रवारी पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास दरोडा पडल्याची घटना घडली आहे.
या दरोड्यात चोरट्यांच्या मारहाणीत तीन जण जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. एका जखमी व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. जखमी मध्ये लिंबाजी चितळे (वय 68), लताबाई चितळे (वय 63) व बाबुराव उळगे (वय 65) या वयोवृद्धांचा समावेश आहे.
घटनास्थळी पोलीस सकाळीच दाखल झाले असून पोलिसांकडून पुढील तपास चालू आहे. तसेच या घटनेत ऐवज किती गेला आहे याची खातरजमा पोलिसांकडून चालू आहे.
नगर येथून श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान घटनेतील जखमी बाबुराव उळगे यांचा मुलगा संगमनेर येथे असतो तो सकाळी आला आहे.
त्याने दिलेल्या माहितीनुसार उळगे यांच्या घरातील रोख रक्कम 20 हजार रुपये व उळगे यांच्या पत्नीच्या अंगावरील अंदाजीत दोन ते अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तसेच चितळे यांच्या घरातील किती ऐवज चोरीला गेला आहे ती माहिती मिळु शकली नाही. दरोडेखोर सहाजण असल्याची माहिती घरातील प्रत्यक्षदर्शींनी दिली.
काही दिवसापासून पाथर्डी शहरासह तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच अवैध धंद्यांचा सुयसुळाटही झाला आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Comments