ढवळपुरी आश्रमशाळेत निवडले वर्गमंत्रीमंडळ
निवडीतून विद्यार्थ्यांना दिले मतदान प्रक्रियेचे मार्गदर्शन
भाळवणी । वीरभूमी- 12-Dec, 2021, 11:19 PM
निवडणुक हा सर्वच भारतीयांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय. निवडणुकीतून आम्ही ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा यासाठी आपले प्रतिनिधी निवडून देतो. हेच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपल्या प्रशासनाचा गाडा चालवितात. ज्यातून आपली लोकशाही शासन व्यवस्था एकदम मजबूत झाली आहे.जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून आज भारताची जगात ओळख निर्माण झाली आहे. याच निवडणुक प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणुन मागील आठ ते दहा वर्षापासून पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील प्राथमिक आश्रमशाळेतील उपक्रमशील शिक्षक लतिफ राजे हे आपल्या वर्गातील वर्ग मंत्रिमंडळाच्या निवडी या प्रत्यक्ष मतदान पद्धतीने घेऊन, विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणातून भारतीय निवडणूक प्रक्रियेची माहिती प्रत्यक्ष कृतीतून करून देतात.
मागील जवळपास दोन वर्षे कोरोनामुळे शाळा बंद होत्या. मात्र यावर्षी ऑक्टोबरपासून शाळा सुरू झाल्या. त्यानंतर दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. ढवळपुरी येथील प्राथमिक आश्रमशाळेतील शिक्षक लतिफ राजे यांनी मुख्याध्यापक संदीप महांडुळे यांच्या परवानगीने व मार्गदर्शनात इयत्ता पाचवीच्या वर्गातील विद्यार्थी मंत्रिमंडळ निवड करताना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचा विद्यार्थ्यांना अनुभव दिला.
यामध्ये विविध सात पदांच्या निवडी करण्यासाठी मतदान अर्ज भरण्यापासून ते मतमोजणी पर्यंतच्या सर्व प्रक्रियेत विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. उमेदवारी अर्ज भरताना त्यावर एक सूचक व अनुमोदक घेणे. पाच रुपये अनामत रक्कम भरणे, मतपत्रिकेवर इंग्रजी वर्णाक्षर एबीसी यांचा चिन्ह म्हणून वापर करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदान कक्षात जाऊन मतदान करणे.
तसेच विद्यार्थ्यांच्या सहकार्याने मतमोजणी करणे, अशा सर्वच प्रक्रिया पार पाडण्यात आल्या. विशेष म्हणजे मतपत्रिकेवर मतदान करण्यासाठी शिक्षक राजे यांनी खोडरबर पासून रबरी शिक्का तयार केला होता.
या निवडणूक प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने व आनंदाने सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थी व शिक्षक यांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करीत ही प्रक्रिया पार पाडली. एकूण सात पदांसाठी जवळपास 17 विद्यार्थी या निवडणूक प्रक्रियेत उमेदवार झाले होते. यात मुलांबरोबरच मुलीही तेवढ्याच चढाओढीने सहभागी झाला होत्या.
काही पदांसाठी अतिशय चुरशीची लढत होऊन फक्त एक मतांच्या फरकाने उमेदवार विजयी झाले. ज्यावेळी मतपत्रिका खोलून मतमोजणी चालू होती, त्यावेळी काही उमेदवार विद्यार्थी स्वतःला पडलेली मते लिहुन घेत होते.
या निवडणूक प्रक्रियेत विजयी झालेले उमेदवार खालील प्रमाणे, वर्गप्रमुख - कु. पूर्वा सतीश भनगडे, उपवर्गप्रमुख- कु. समीक्षा संदीप भनगडे, अभ्यास प्रमुख- अनुष्का धोंडीभाऊ वाळुंज, क्रीडा प्रमुख - अथर्व दाजीबा वाघ, वाचनालय प्रमुख- कु. चैतन्या बाबाजी वाजे, आरोग्य प्रमुख- कु. संस्कृती मनोज देवकाते, सांस्कृतिक प्रमुख- कु. अनुष्का सतीश भनगडे असे आहेत.
निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व उमेदवारांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. अशा प्रकारे ही भारतीय निवडणूक प्रक्रियेची माहिती मिळाल्याने व आपण प्रत्यक्ष मतदान केल्याचे समाधान विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर दिसत होते.
Tags :
Comments