समोर पराभव दिसत असल्यानेच आमदारांनी भाजपाचे उमेदवार फोडले
माजी मंत्री राम शिंदे यांची आ. रोहित पवारांवर टीका । माजीमंत्री शिंदेंचे ठिय्या आंदोलन, मौन व्रत स्थगित
कर्जत । वीरभूमी- 14-Dec, 2021, 09:14 PM
कायदा, नियम धाब्यावर बसवून विद्यमान आमदारांनी प्रशासनास हाताशी धरत भाजपाच्या उमेदवारी अर्ज माघार घेण्यात पक्षपातीपणा केला. दोन वर्षात विद्यमान आमदारांनी काहीच केले नाही म्हणून त्यांना समोर पराभव दिसत होता. म्हणून राजकारणात कालचा घाणेरडा प्रकार केला, अशी टीका माजीमंत्री राम शिंदे यांनी केली. यावेळी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याही कालच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला.कर्जत येथील गोदड महाराज मंदीरासमोर ठिय्या आंदोलन व मौनव्रत सोडत शहरातून काळ्या फिती लावून मूक रॅली काढली. रॅलीने अक्काबाई मंदिरासमोर भाजपा उमेदवाराच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी माजी मंत्री राम शिंदे बोलत होते.
राम शिंदे यांनी आ. रोहित पवार यांचे नाव न घेता त्यांच्या दोन वर्षाचे कामावर टीकास्त्र सोडले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, दिलीप भालसिंग, पक्ष निरीक्षक बाळासाहेब महाडीक, भगवान मुरूमकर, अजय काशीद, किसान मोर्चाचे सुनील यादव, राजेंद्र म्हस्के, शांतीलाल कोपनर, काका धांडे आदी उपस्थित होते.
यावेळी राम शिंदे म्हणाले की, दोन वर्षात आमदारांनी फक्त भाजपाचे लोकप्रतिनिधी फोडून आपला राष्ट्रवादीचा झेंडा लावला. सोशल मीडियावर आणि व्हाट्सअपवर तुमचा विकास दाखवू नका. लोकांनी तुम्हाला संधी दिली आहे, त्यांच्या प्रश्नावर काम करा. आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात आपण फक्त घोषणा नाही केली. त्यावर प्रत्यक्ष काम केले आणि कर्जतकराचे प्रश्न सोडवले. दोन वर्षात कुकडी पाण्याचे नियोजन कोलमडून टाकण्याचे काम यांनी केले आहे.
माथे फिरल्यासारखे वागू नका. कर्जतची जनता तुमचे माथे जाग्यावर आणण्याचे काम करील. जे आपल्या सोबत होते आता तिकडे गेले आहे. त्यांनी काय काय केले आहे ते मी आता विसरणार नाही. म्हणत पक्षांतर करणार्यावर भाष्य केले.
भावी नगरसेवक आणि भाजपाच्या चाणक्यला साधे निवडणुकीची उमेदवारी मिळत नसल्याचे म्हणत खरपूस समाचार घेतला. आपल्या सर्व उमेदवारांना विकासाच्या कामावर मतदान करत त्यांना संधी द्यावी, असे आवाहन राम शिंदे यांनी उपस्थित जनसमुदायास केले.
जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे म्हणाले की, 2019 साली मतदारसंघात विधानसभेला चुक झाली. आपला तो आपलाच असतो. आणि दुसरा तो शेवटी दुसराच असतो, असे म्हणत आ. पवार यांना लक्ष केले. दोनच वर्षात यांनी आपले रंग दाखवले. लोकांना भावनिक करून सत्ता घेतली आणि स्वार्थ साधला. बारामतीला दडपशाही करत सत्ता मिळवली असेल पण कर्जत-जामखेडला ते जमणार नाही. कारण येथील जनता स्वाभिमानी आहे.
दादा सोनमाळी म्हणाले की, कर्जतच्या राजकारणात काळ्या अक्षराने लिहण्याची परिस्थिती काल सर्व राज्याने पाहिली. राजकारण करत असताना कालची सारखी परिस्थिती कर्जतकरानी पहिलीच अनुभवली. भाजपाच्या महिला उमेदवारांना गाडीत घालून आणण्याचा प्रकार घडला. त्यांना साधी नजरा-नजर करताना अडचण निर्माण झाली होती. एवढी मोठी दहशत विरोधकांची पहावयास मिळत आहे. याप्रसंगी पोलीस प्रशासन, महसुल प्रशासन हतबल झाले होते. यांनी विकास केला असेल तर लोकशाही पद्धतीने निवडणुकीस सामोरे जावे. यात दहशत निर्माण करून लोकप्रतिनिधी काय साध्य करीत आहे? असा सवाल उपस्थित केला.
कर्जतकर क्रांतिकारक आहे. ती क्रांती कर्जतकर कायम करीत असतात, हे आ. पवार यांनी पुढील दिवसात पाहावे. अधिक दडपशाही भविष्यात करताल तर आगामी दिवसात मातीत मिळताल, असा सूचक इशारा आपल्या भाषणात केला. ज्यांना तुम्ही नावे ठेवली आज त्यांनाच जवळ घेत घाणेरडे राजकारण करत असल्याचे म्हणत पक्षांतर करणार्यावर टीकास्त्र सोडले.
विकासाच्या नावावर मतदान मागणारे आज हातात दंडुका घेत, लोकांवर दबाव टाकत मतदान मागत आहे ही शोकांतिका आहे. मतदारांचा सर्व्हे करून राष्ट्रवादीला योग्य जागा मिळत नसल्याने असे प्रकार सुरू झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी तुम्हाला कर्जतकरांनी जिल्हा बँकेत दणका दिला आहे. ते ध्यानात ठेवा. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दबावात घेण्याची पद्धती सोडा.
यावेळी पक्ष निरीक्षक बाळासाहेब महाडीक, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, जामखेडचे तालुकाध्यक्ष अजय काशीद, दिलीप भालसिंग, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, दादासाहेब सोनमाळी यांची भाषणे झाली. प्रास्ताविक सचिन पोटरे यांनी केले तर अनिल गदादे यांनी आभार मानले. यावेळी आरपीआयचे संजय भैलुमे, विनोद दळवी, तारक सय्यद, विशाल काकडे, दत्ता कदम, रवी सुरवसे, शरद मेहत्रे, पप्पू धोदाड, गणेश पालवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रोहित पवार यांचा पुढचा मतदारसंघ करमाळा ः सुनील कर्जतकर
आ. पवार यांनी सध्या करमाळा तालुक्यातील कारखान्याकडे लक्ष दिले असून पुढची विधानसभा निवडणुक ते कर्जत-जामखेड या मतदारसंघातून न लढविता करमाळ्यातून आमदार होण्याची तयारी करीत आहे. त्यामुळे रोहित पवार हा विषय आपण सोडून द्या आणि कर्जत नगरपंचायतीमध्ये सर्वच उमेदवारांनी कामा लागा आणि विजय संपादन करीत विरोधकांना उत्तर द्या. असे सांगत जे पक्ष सोडून पळाले त्यांना आपल्या भाषणात कर्जतकर यांनी चांगलेच फटकारले.
मालकाने काम केले मात्र गड्याने पाठ थोपटून घेतली ः पिसाळ
ज्याच्यावर सर्व राजकारण केले ते दुकान बंद झाल्याने गडी तिकडे गेला. राम शिंदेंनी मंत्रीपदाच्या काळात कर्जत नगरपंचायतीसाठी मोठा निधी उपलब्ध केला. त्या निधीद्वारे कर्जत शहराचा विकास केला. मात्र ज्याच्या हातात निधी दिला त्या गड्याने स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. मात्र कर्जतची जनता सुज्ञ आहे ती विरोधकांना त्यांची जागा दाखवेल, असे म्हणत नामदेव राऊत यांना अंबादास पिसाळ यांनी लक्ष केले.
bBXDzyxUSNkudPWa