मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर लक्ष । घराघरात जावून मतदारांच्या घेतल्या भेटी
कर्जत । वीरभूमी- 15-Dec, 2021, 01:06 AM
कर्जत नगरपंचायतीचा बिगुल वाजला असून उमेदवारी अर्ज माघारीनंतर मंगळवारी प्रशासनाने चिन्ह वाटप केल्याने प्रचाराचा शुभारंभ झाला. यामध्ये आ. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आणि मित्रपक्षाने प्रचाराचा शुभारंभ झाला. आ पवारांनी घरा-घरात जात सर्वसामान्य नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेत राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाला साथ द्यावी अशी साद मतदारांना घातली.
ओबीसी आरक्षणबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल न आल्याने कर्जत नगरपंचायत निवडणुकीत काहीसा निरुत्साह दिसत होता. त्यात काल उमेदवारी अर्ज माघार घेताना घडलेल्या नाट्यमय घडामोडीने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. 13 जागेच्या निवडणुकीसाठी 32 उमेदवार आपले नशीब आजमावत आहे. काही प्रभागात दुरंगी तर काही मध्ये तिरंगी आणि चौरंगी लढत पाहायला मिळत आहे.
बुधवारी निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. आ. रोहित पवार यांनी प्रचारात आघाडी घेत प्रत्येक प्रभागनिहाय मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी-भेटीवर भर देत राष्ट्रवादी-काँग्रेस व मित्रपक्षाच्या उमेदवारांना साथ द्यावी आणि मतदान करावे, अशी साद घालत आहे. आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात दोन वर्षात केलेली विकासकामे, कर्जत शहराचे बदललेले रूप, भविष्यात प्रलंबित असलेले कर्जतकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी कटीबद्ध असल्याचे आ. पवार यांनी सर्वसामान्य नागरिकांना आश्वासन दिले आहे.
निवडणूक होणार की नाही, याबाबत उमेदवारांसह मतदार देखील संभ्रमात
ओबीसी आरक्षणामुळे कर्जत नगरपंचायतीच्या चार प्रभागाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. 13 प्रभागासाठी प्रशासनाने निवड प्रकिया पूर्ण केली असून उमेदवारी अर्ज माघारीनंतर चिन्ह देखील वाटप करण्यात आले. प्रत्यक्ष प्रचारास देखील आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक राजकीय तज्ञ मंडळी निवडणूक रद्द होईल, अथवा पुढे ढकलली जाईल. असे अंदाज वर्तवित असल्याने उमेदवारांसह मतदार देखील संभ्रम अवस्थेत दिसत आहेत. याबाबत प्रशासनाकडे अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी देखील निवडणुक आयोगाकडे बोट दाखवत प्रकिया पूर्ण करीत असल्याचे सांगितले.
DwkcMqWeU