आतापर्यंत 67 अर्ज दाखल
श्रीगोंदा । वीरभूमी- 15-Dec, 2021, 11:15 PM
सहकार महर्षी कुंडलिकराव रामराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्व. कुंडलिकराव जगताप यांच्या स्नुषा व माजी आमदार राहुल जगताप यांच्या पत्नी डॉ. प्रनोती राहुल जगताप यांनी सोसायटी मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरल्याने जगताप कुटुंबातील महिला पहिल्यांदाच राजकारणात सक्रिय झाली आहे.
तर सर्वसाधारण मतदार संघात कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष राहुल जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी आमदार राहुल जगताप यांच्या मातोश्री अनुराधाताई जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, बाळासाहेब उगले यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी अभिमान थोरात यांच्याकडे अर्ज दाखल केले.
तालुक्यातील कुकडी सहकारी साखर कारखान्याची निवडणुक 15 जानेवारीला होत असून 21 जागांसाठी होणार्या निवडणुकीत डॉ. प्रनोती यांनी सोसायटी मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यावेळी बोलताना माजी आमदार राहुल जगताप म्हणाले की, उच्चविद्याविभूषित असलेल्या डॉ. प्रनोती यांना समाजकारण करण्याची आवड आहे. कारखाना व शिक्षण संस्थेत लक्ष देऊन त्यांनी वेळोवेळी चांगले सल्ले दिले आहे. व शेतकर्यांची कामधेनू असलेला कुकडी कारखाना योग्य दिशेने जाण्यासाठी नेहमी डॉ. प्रनोती प्रयत्नशील असतात.
राहुल जगताप यांचे कारखाना राजकारणात पारंपरिक विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांना जगताप यांनी विधानसभेची उमेदवारी देऊन खंबीर साथ दिली व विजयाचा समीप नेले. त्यामुळे शेलार या पंचवार्षिक निवडणुकीत राहुल जगताप यांना सर्वोतोपरी साथ देत आहेत. मागील निवडणुकीत शेलार यांनी जगताप यांना आव्हान दिले होते.
सध्यातरी निवडणूक जगताप यांच्या बाजूने एकतर्फी दिसत आहे. पारंपरिक विरोधक दिनकर पंधरकर व दत्ता पानसरे, बाळासाहेब नाहाटा हे स्व. सदाशिव पाचपुते यांचे चिरंजीव साजन पाचपुते यांना पुढे करत विरोध करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचा हा प्रयत्न तोकडा पडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. कमी धारेचा विरोध असल्याने काही जागा विरोधकांना देत राहुल जगताप ही निवडणूक बिनविरोध करण्याची शक्यता आहे.
अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाल्यानंतर बुधवार दि.15 रोजी पर्यंत 67 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. राहुल जगताप यांनी सर्वसाधारण मतदार संघात तर त्यांच्या पत्नी डॉ. प्रनोती जगताप यांनी सेवा संस्था मतदारसंघात अर्ज दाखल केले आहेत.
Comments