नागवडेसाठी शेवटच्या दिवसाअखेर 306 अर्ज दाखल
पाचपुते-मगर जमली गट्टी.. नागवडे कारखाना निवडणुकीची तापली भट्टी
विजय उंडे । वीरभूमी- 17-Dec, 2021, 11:03 PM
श्रीगोंदा ः नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजेंद्र नागवडे, केशवराव मगर व बबनराव पाचपुते या तिन्ही नेत्यांचे तीन पॅनल आपापसात लढणार असल्याचे वरकरणी दिसत होते. पाचपुते यांनी निवडणूक लढण्याची भीमगर्जना केली होती. तर राजेंद्र नागवडे पाचपुते यांच्याकडून विधानसभेला मदत केल्याची परतफेड करावीच लागेल, असा आत्मविश्वास बाळगून होते. परंतु पाचपुते यांची नागवडे यांच्याबरोबर साथ देण्याची इच्छा असूनही कार्यकर्त्यांच्या रोषापाई पारंपारिक विरोधक मगर यांच्याशी जुळवून घ्यावे लागले.तालुक्यात पाचपुते यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. विधानसभेला पाचपुते यांना राजेंद्र नागवडे यांनी मदत केली. परंतु नागवडे यांच्या कार्यकर्त्यांनी नागवडे यांचे आदेश न मानता राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार यांना मदत केली. हाच धागा पकडून पाचपुते यांच्या कार्यकर्त्यांनी पाचपुते यांना सांगितले की, तुम्ही नागवडे यांना मदत केली तर आम्हाला मोकळं रान सोडून द्या. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पाचपुते यांनी केशवराव मगर यांच्याबरोबर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने वरकरणी केशवराव मगर यांचे पारडे जड झाले आहे. मगर यांना पाचपुते यांचा आयता कार्यकर्त्यांचा ताफा मिळाल्याने निवडणुकीत रंग भरून जोश निर्माण झाला आहे.
माजी आमदार राहुल जगताप बरोबरच होणार्या कुकडी कारखाना निवडणुकीत व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. मोठ्या फळीच्या नेत्यांपैकी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्या रूपाने एकमेव मुलूखमैदानी तोफ राजेंद्र नागवडे यांच्याबरोबर आहे. तर जवळपास दुसर्या फळीचे सर्व नेते केशवराव मगर यांची बाजू भक्कम करण्यासाठी सरसावले आहेत. विद्यमान संचालक मंडळातील अनेकवेळा संचालक राहिलेल्या व काहीच काम न दिसलेल्या संचालकांवर आपापल्या गटात सभासदांचा रोष आहे. त्यामुळे नव्या चेहर्यांना संधी दिली तरच नागवडे पारंपरिक मते राखू शकतात.
याशिवाय काही संचालक व राजेंद्र नागवडे यांच्यात दुरावा निर्माण झाल्याने त्यांचा उमेदवारीत पत्ता कट होणार आहे. केशवराव मगर यांच्याबरोबर मातब्बर नेते बबनराव पाचपुते, अण्णासाहेब शेलार, जिजाबापू शिंदे, बाळासाहेब गिरमकर, वैभव पाचपुते, गणपतराव काकडे, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य वेगवेगळ्या पदावरील नेत्यांचा संच आहे. तर राजेंद्र नागवडे यांना बापूंची सहानुभूती व वेळच्यावेळी उसाचे पेमेंट तारणहार ठरणार आहे.
एकमात्र खरं आहे की, या निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर होणार आहे. सभासदांना पैशांबरोबरच मद्य-मदिरा व जेवणावळीचे आमीष दाखवण्याचा प्रकार होऊ शकतो. शेवटी राजेंद्र नागवडे व केशवराव मगर दोघेही बापूंचा वारसा सांगत आहेत. शेवटी सहकाराचा खरा वारसदार 19 हजार 841 सभासदच ठरविणार आहेत.
नागवडे कारखान्याच्या निवडणूक कार्यक्रम सुरू झाल्यापासून आजपर्यंत सर्व 21 जागांसाठी तब्बल 306 अर्ज दाखल झाले. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बाबासाहेब भोस, केशवराव मगर, भगवानराव पाचपुते, अण्णासाहेब शेलार, प्रतिभा पाचपुते या बड्या नेत्यांनी अर्ज दाखल केले. यामध्ये सर्वसाधारण गटात उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे काष्टी 26, कोळगाव 29, बेलवंडी 43, टाकळी कडेवळीत 35, लिंपणगाव 47 असे एकूण 205 अर्ज दाखल झाले.
सेवा संस्था प्रतिनिधी गटात 8, महिला प्रतिनिधी 38, इतर मागास प्रवर्ग 25, अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी गटात 12 व भटक्या विमुक्त जाती-जमाती गटात 16 अर्ज दाखल झाले. एकूण 508 अर्जांची विक्री झाली होती परंतु अंतिम 304 अर्जच दाखल झाले.
Comments