संघर्ष समिती अध्यक्ष संजय बडे यांनी दिला जनआंदोलनाचा इशारा
पाथर्डी । वीरभूमी - 18-Dec, 2021, 01:52 PM
पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरणार्या भगवानड परिसर व 46 गावे पाणीपुरवठा योजनेची वस्तुस्थिती सांगणारी पोस्ट संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय बडे यांनी सोशल मीडियावर टाकली आहे. या पोस्टच्या माध्यमातून संजय बडे यांनी भगवानगड पाणी योजनेची वस्तुस्थिती सांगत 20 फेब्रुवारी पर्यंत योजनेला मंजुरी दिली तर खूप आनंद होईल अन्यथा पुन्हा जनआंदोलन उभे करावा लागेल, असा इशारा दिला आहे.
दोन दिवसापुर्वी मुंबई येथे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भगवानगड परिसर व 46 गावे पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाल्याबाबत आ. मोनिका राजळे तसेच अॅड. प्रताप ढाकणे व माजी आ. चंद्रशेखर घुले यांच्याकडून स्वतंत्रपणे सांगिण्यात आले. योजनेला आमच्या प्रयत्नाने मंजुरी मिळाली, असा दावा केला गेला.
पाणी योजनेला मंजुरी मिळाल्याची माहिती कळताच पाथर्डी शहर व खरवंडी कासार परिसरात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. मात्र पाणीयोजना संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय बडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून भगवानगड पाणी योजनेबाबतची वस्तुस्थिती मांडली आहे. यामुळे जणू लाभार्थी गावांतील नागरिकांनी हुरळून न जाता सावध राहण्याचा इशाराच बडे यांनी दिला आहे. संजय बडे यांनी मोजक्या शब्दात सोशल मीडियावर पोस्ट करत लाभार्थी गावांना मोठा संदेश दिला आहे.
भगवानगड पाणी योजना संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय बडे यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘मी नम्रपणे सांगतो. माझा कोणालाही विरोध नाही. पण वस्तुस्थिती समाजाला माहीत असली पाहिजे. परवा मुंबईत झालेल्या बैठकीत भगवानगड व परीसर पाणीपुरवठा योजनेला 15 जानेवारी पर्यंत तांत्रिक मान्यता घेऊन 20 फेब्रुवारी पर्यंत वर्क ऑर्डर देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करू, असे तोंडी आस्वासन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. योजनेला मंजुरी दिलेली नाही. 20 फेब्रुवारी पर्यंत झाले तर खूप आनंद होईल. अन्यथा, आपल्याला सर्वांना मिळून खूप मोठे जनआंदोलन उभे करावे लागेल. लोहा गरम आहे तोपर्यंतच हातोडा मारू’. असे म्हटले आहे.
याबाबत संजय बडे यांच्याशी संपर्क साधला असता वीरभूमीशी बोलतांना ते म्हणाले, भगवानगड व परिसरातील गावांना पाणी मिळावे, यासाठी योजनेची कल्पना मांडली होती. ती कल्पना सत्यात येण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. योजना मंजुरीचे श्रेय कोणीही घेतले तरी चालेल. मात्र या परिसरातील गावांना पाणी मिळाले तर तो आनंद खूप मोठा आहे. मात्र 20 फेब्रुवारी पर्यंत पाणीयोजनेबाबत निर्णय न झाल्यास पुन्हा जनआंदोलन उभारावे लागेल.
Comments