राज्य ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघातील जोहरवाडीतील प्रकार
करंजी । वीरभूमी - 23-Dec, 2021, 09:48 AM
वीज बिल भरण्याच्या नावाखाली महावितरणच्या कर्मचार्यांकडून शेतकर्यांना अक्षरशः फसवले जात आहे. नादुरुस्त रोहीत्रच शेतकर्यांच्या हवाली केली जात असल्याचा प्रकार जोहरवाडी येथे घडला आहे. महावितरणच्या या हलगर्जीपणामुळे शेतकर्यांची पिके जळण्याचा आता धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे जोहारवाडी हे गाव राज्य ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघातील आहे.
याबाबत सविस्तर असे की, पाथर्डी तालुक्यातील जोहारवाडी येथील सावंत वस्ती जवळील फुटवढा येथील रोहीत्र तीन आठवड्यापूर्वी जळाले होते. सदर रोहीत्रावरील लाभार्थी शेतकर्यांनी रोहीत्र दुरुस्त करण्यासाठी महावितरणच्या कर्मचार्यांशी संपर्क केला. त्यावेळी कर्मचार्यांनी सदर रोहीत्रावरील शेतकर्यांनी थकबाकी भरावी असे शेतकर्यांना सांगितले.
शेतकर्यांनी तात्काळ एकत्र येत प्रति शेतकरी तीन हजार रुपये व दुरुस्ती खर्च म्हणून स्वतंत्र ज्यादा पैसे जमा केले. थकबाकी भरल्यानंतर महावितरणने रोहीत्र काढून केडगाव येथून दुरुस्त करून आणले. रोहीत्र बसवले 24 तास त्यामधील ऑइल गरम करण्यासाठी चालू ठेवले व त्यानंतर रविवारी रोहीत्र चालू केले. त्यावेळी रोहीत्र खराब असल्याचे कर्मचार्यांनी सांगितले.
पुन्हा दोन दिवसांनी केडगावरून रोहीत्र बदलुन आणले व बसवले. ऑईल गरम केले व चालु केले असता चोविस तासात तिसरे रोहीत्रही खराब झाले. रोहीत्र बसवले आता विज येणार म्हणुन शेतकर्यांनी गहु तसेच घास पेरला. तो मात्र आता उगवण्याआधीच जळुन चालला आहे. तर काही उभी पिके जळु लागली आहेत. राज्य उर्जा मंत्र्यांच्या मतदारसंघातच असे प्रकार घडत असल्याबद्दल शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली.
केडगाव येथे रोहीत्र दुरुस्त करण्यासाठी दिले जात असता दुरुस्त होऊन येण्याऐवजी नादुरुस्त रोहीत्र येतेच कसे? ताब्यात देताना रोहीत्राचे टेस्टिंग होत नाही का? की मुद्दाम शेतकर्यांना वेठीस धरण्यासाठी असा प्रकार होतो? शेतकर्यांची पिके जळल्यास कोण जबाबदार? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.
Comments