शेवगाव तहसील कार्यालयात शांततेत मतमोजणी
शेवगाव । वीरभूमी - 23-Dec, 2021, 10:13 AM
शेवगाव तालुक्यातील मळेगाव शे व वडुले बुद्रुक ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी झालेली पोटनिवडणूक शांततेत पार पडली. या पोटनिवडणुकीत मळेगाव-शे मधून सुरज सुरेश घोरपडे व वडुले बुद्रुक मधून शोभा भाऊसाहेब जायगुडे हे विजयी झाले आहेत.
शेवगाव तालुक्यातील मळेगाव शे व वडुले बुद्रुक ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एक जागा रिक्त झाल्या होत्या. या रिक्त जागेसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक निवडणूक जाहीर केली होती. या रिक्त जागेसाठी मंगळवारी मतदान झाले तर आज बुधवारी मतमोजणी झाली.
शेवगाव तहसील कार्यालयात मतमोजणीला सकाळी प्रारंभ होवून अवघ्या काही मिनिटात दोन्ही जागेचा निकाल जाहीर करण्यात आला.
यामध्ये मळेगाव शे ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात होते. अटीतटीच्या निवडणुकीत सुरज सुरेश घोरपडे अवघ्या 4 मताने विजयी झाले. उमेदवारांना पडलेली मते- सुरज सुरेश घोरपडे (206 विजयी), अमोल अण्णा साबळे (129), अमोल अरुण बनसोडे (202) आणि नोटा (5) असे मते पडली.
वडुले बुद्रुक ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शोभा भाऊसाहेब जायगुडे भरघोष मताने विजयी झाल्या. त्यांना 241 मते तर विरोधी नुरजान शब्बीर शेख यांना 191 मते पडली. तसेच नोटाला 6 मते पडली.
दोन्ही जागेचा निकाल लागताच उमेदवारांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करत फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन कृषी पर्यवेक्षक अजय देशमुख यांनी तहसीलदार छगनराव वाघ, नायब तहसीलदार काथवटे यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहिले.
Comments