हिरडगाव, सांगवी दुमाला आणि कामठी ग्रामपंचायत पोटनिवडणुकींचा निकाल जाहीर
श्रीगोंदा । वीरभूमी- 23-Dec, 2021, 03:01 PM
श्रीगोंदा तालुक्यातील कामठी, सांगवी दुमाला आणि हिरडगाव या ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी होऊन बुधवार दि.22 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला.
कामठी ग्रामपंचायत गणेश सुभाष कांबळे, सांगवी दुमाला ग्रामपंचायत संतोष संपत भोईटे, हिरडगाव ग्रामपंचायत सारिका राजेंद्र दरेकर हे उमेदवार विजयी झाले. तहसिलदार मिलिंद कुलथे व नायब तहसिलदार पंकज नेवासे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कामठी ग्रामपंचायतसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. डी. कांगुणे तर हिरडगाव व सांगावी दुमाला या ग्रामपंचायतसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के. एम. जगताप यांनी काम पहिले.
श्रीगोंदा तालुक्यातील 59 ग्रामपंचायतीच्या 567 जागांसाठी जानेवारी 2021 मध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली होती. यातील सांगवी दुमाला ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग क्र. 2 आणि प्रभाग 3 मधून दिगांबर ज्ञानदेव नलगे हे विजयी झाले होते. दोन प्रभागातून निवडून आल्यामुळे त्यांनी प्रभाग क्र. 2 चा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
त्यावेळी ते केवळ 3 मतांच्या फरकाने निवडून आले होते. त्यामुळे रिक्त जागेसाठी झालेल्या पोट निवडणुकीमध्ये त्यांच्या मातोश्री सरस्वती ज्ञानदेव नलगे यांना 134 मते व भोईटे संतोष संपत यांना 239 मते मिळाली. यामध्ये भोईटे संतोष संपत हे 105 च्या फरकाने विजयी झाले.
तर हिरडगाव ग्रामपंचायतीच्या तत्कालीन विद्यमान सरपंच संगीता भालचंद्र दरेकर यांना 3 अपत्य असल्याने त्यांना अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवले होते. त्यामुळे प्रभाग क्र. 3 या रिक्त जागेसाठी झालेल्या पोट निवडणुकीत दरेकर सारिका राजेंद्र यांना 517 मते मिळवून 295 मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांच्या विरोधात भुजबळ जयश्री नवनाथ यांना 222 मते मिळाली.
तसेच कामठी ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्र.3 या एका जागेसाठी उमेदवारच मिळू शकला नव्हता त्यामुळे ती जागा रिक्त राहिली होती. या रिक्त जागेसाठी झालेल्या पोट निवडणुकीत गणेश सुभाष कांबळे यांना 190 मते तर तोरडे राजू बापू यांना 186 मते मिळाली त्यामुळे गणेश सुभाष कांबळे हे 4 मतांनी विजयी झाले.
Comments