हभप. राम महाराज झिंजुर्के यांची माहिती
शेवगाव । वीरभूमी - 30-Dec, 2021, 01:39 PM
नविन वर्षाचे स्वागत अविचाराने न करता संत विचारांच्या प्रबोधनाने करण्यासाठी उद्या शुक्रवार, दि. 31 डिसेंबर ‘सुसंस्कार दिन’ म्हणुन साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रमुख हभप. राम महाराज झिंजुर्के यांनी दिली.
सध्याच्या तरूण पिढीवर सुसंस्कार व्हावेत, या हेतुने शेवगाव शहरातील कोरडेवस्ती येथील जोग महाराज नगर येथे दि. 31 डिसेंबर रोजी पहाटे पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत या सुसंस्कार दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हभप. राम महाराज झिंजुर्के म्हणाले की, सध्याची तरूण पिढी आपल्या धार्मिक संस्कृतीच्या अज्ञानाने व कुविचाराने 1 जानेवारी नवीन वर्ष स्वागताकरीता 31 डिसेंबरला समाज विध्वसंक कृती करून आपल्या संस्कृतीचा घोर अपमान करतात. त्यांचे प्रबोधन होऊन त्यांचेवर सुसंस्कार व्हावे, या हेतुने या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे 5 ते 7 वेळेत काकडा भजन, सकाळी 7 ते 8- महालक्ष्मीमाता, हनुमंतराय, संत तुकाराम व जोग महाराज यांची मुर्तीपुजा तसेच श्रीविष्ण ूसहस्रनाम, पांडुरंगाष्टक व रामकृष्ण हरी मंत्र जपानुष्ठाण, सकाळी 8.30 ते 10 - ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 10.30 ते 12 - श्री तुकाराम महाराज गाथा भजन, दुपारी 12 ते 2 - भव्यदिंडी प्रदक्षिणा व रिंगण सोहळा, दुपारी 2 ते 4 - महिला संगित भजन, दुपारी 4 ते 5 - प्रवचन, सायंकाळी 5 ते 6 - सामुदायिक परिपाठ, रात्री 6 ते 8 - किर्तनसेवा व त्यानंतर संगित भजन आदी कार्यक्रम या वेळी होणार आहेत.
सकाळी नाष्टा व दिवसभर भाजी भाकरी जेवणाची सोय शहरातील दानशूर व्यक्तींनी केली आहे. ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे शासनाचे सर्व नियम पाळून नागरीक व तरूणांनी गर्दी होऊ न देता सहभागी व्हावे, असे आवाहन हभप. राम महाराज झिंजुर्के यांनी केले आहे.
dVzxHaKQfyZmp