ट्विट करत दिली माहिती । संपर्कात आलेल्यांना टेस्ट करण्याची विनंती
अहमदनगर । वीरभूमी - 30-Dec, 2021, 02:04 PM
राहुरी मतदार संघाचे विधानसभा सदस्य तथा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पाठोपाठ राहाता विधानसभा सदस्य आ. राधाकृष्ण विखे कोरोना बाधित झाले आहेत. या दोन्ही नेत्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून माहिती देत संपर्कात आलेल्यांना टेस्ट करून घेण्याची विनंती केली आहे.
हिवाळी अधिवेशन नुकतेच संपले आहे. अधिवेशना दरम्यान काही आमदारांसह कर्मचारी, पोलिस, पत्रकार यांना कोरोना संसर्गाची लागण झाली होती. त्यातच बुधवारी राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली.
याबाबत त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन याबाबतची माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, “आज माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तब्येत व्यवस्थित आहे. या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली काळजी घ्यावी. कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार सुरू करावेत ही विनंती”.
तर आज गुरुवारी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आपल्या ट्विटर अकाउंटवरून माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझीटीव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयी बद्दल क्षमस्व. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी”. असे म्हटले आहे.
जिल्ह्यातील एका मंत्र्यासह एका आमदाराला कोरोना संसर्ग झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र दोन्ही नेत्यांची प्रकृत्ती चांगली असून संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले आहे. यामुळे गेल्या दिवसात संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले आहेत.
VToshFdKOGYjQLcW