भाजपाचे युवा नेते बंडू पाठक यांची मागणी
करंजी । वीरभूमी- 01-Jan, 2022, 09:25 PM
गेल्या काही दिवसापासून वारंवार होत असलेल्या वातावरणातील बदलाने व अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे कांदा आणि फळ पिकाला राज्य शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाचे युवा नेते व सेवा सोसायटीचे चेअरमन बंडू पाठक यांनी केली आहे.
गेल्या दोन वर्षापासून लॉकडाऊन मुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत आला आहे. शेतीच्या कोणत्याही उत्पादनाला भाव मिळत नाही. यावर्षी सततच्या होणार्या पावसामुळे कांदा पिकावर मोठा रोग पडून कांद्याचे 85 टक्के उत्पादन घटले आहे. त्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीची सरकारने तातडीने पाहणी करून त्याचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पाठक यांनी शासनाकडे केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये व खास करून दुष्काळी भागामध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी उत्पादन घेतात. कांद्याला लागवडीचा खर्च सुमारे 15 हजार, खुरपणी 10 हजार रुपये, औषध फवारणी दहा हजार रुपये व काढणीला दहा हजार रुपये असा सुमारे प्रति एकर 45 हजार रुपये खर्च येतो.
आज हा खर्चही निघणे शक्य होत नाही. प्रति एकरी सुमारे 100 टन उत्पादन होत असताना आता ते दहा ते पंधरा टनापर्यंतच कांदा उत्पादन होत असल्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संत्रा व मोसंबी पिकाचेही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. फळ पिवळे पडणे, काळे होणे, कोळी रोगाचे प्रमाण वाढणे व झाडेही पिवळे पडणे असे अनेक रोग फळझाडांना होत आहेत.
त्यामुळे शेतकर्यांचे फळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एकीकडे नैसर्गिक संकट आणि दुसरीकडे शासनाने वीज कट करून जाणुन बुजुन आणलेले अस्मानी संकट यामुळे शेतकरी पूर्ण हताश झाला आहे.
या कारणाने शेतकर्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने तातडीने या नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच पिक विम्याचे पैसे ही तातडीने द्यावेत, अशी मागणी बंडू पाठक यांनी केली आहे.
vramwZskG