बिरसा ब्रिगेड आदिवासी संस्कृतीची पुरस्कर्ती, राजकारण्यांचे आरोप चुकीचे
काशिनाथ कोरडे । बिरसा ब्रिगेड ही कोणत्याही धर्म, पंथ वा संप्रदाया विरोधी नाही
अकोले । वीरभूमी - 03-Jan, 2022, 09:38 AM
बिरसा ब्रिगेडची तालुक्यात वारंवार बदनामी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे समाजात संभ्रम निर्माण करुन बिरसा ब्रिगेडची भूमिका चुकीची असल्याचे भासवले जात आहे. राजकारणासाठी काही नेते मंडळी आरोप करत आहेत ते चुकीचे असुन बिरसा ब्रिगेड ही कोणत्याही धर्म, पंथ वा संप्रदायाविरोधी नाही.बिरसा ब्रिगेड फक्त आदिवासी संस्कृतीची पुरस्कर्ती असल्याची भुमिका बिरसा ब्रिगेडचे सह्याद्री विभाग अध्यक्ष काशिनाथ कोरडे यांनी स्पष्ट केली.बिरसा ब्रिगेड या संघटनेची भूमिका मांडण्यासाठी अकोले तालुका बिरसा ब्रिगेडच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली, यावेळी काशिनाथ कोरडे बोलत होते. यावेळी बिरसा ब्रिगेडचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष भरत तळपाडे, कार्याध्यक्ष दीपक देशमुख, तालुका प्रसिद्धी प्रमुख यशराज कचरे, रवींद्र तळपाडे, लक्ष्मण धांडे आदी बिरसा ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना कोरडे म्हणाले की, बिरसा ब्रिगेड ही एक नेतृत्वाखालील संघटना नसून आदिवासी समाजाचे एक सामाजिक संघटन आहे. जे 7 राज्यात आदिवासी हितार्थ काम करत आहे व संविधानिक हक्क व अधिकारासाठी लढत आहे. जल, जंगल, जमीन बरोबरच संस्कृती, अस्मिता, हक्क, अधिकार, क्रांतीवीराचा इतिहास यावर जनजागृतीच्या माध्यमातुन हा लढा उभा केला आहे.
आदीवासी हिंदू नाही, मुस्लिम नाही, ख्रिश्चन नाही, बौद्ध नाही, जैन नाही, पारशी नाही. परंतु आदिवासींना सर्व धर्मात ओढण्याचे काम चालू आहे. यांच्याकडून जो युक्तिवाद केला जात आहे की, महादेवाला बिरसा ब्रिगेड देव मानत नाही. परंतु सर्वांनी समजून घेतले पाहिजे की, आदिवासींचे देव, दैवते ही निसर्गपूजक आहेत. म्हणजे आम्ही निसर्गाला पूजतो ते आमचे देव आहेत. म्हणजेच वरसुबाई म्हणजे वरसाचे झाड, कळमजाई म्हणजे कळंबाचे झाड, घोरपडाई म्हणजे घोरपड प्राणी, वाघोबा म्हणजे वाघ प्राणी, सालोबा म्हणजे सालाचे झाड, उंबर्या म्हणजे उंबराचे झाड, बहिरोबा, ढाकोबा, दुर्गुबाई, कळसुबाई इत्यादी जे निसर्गातील ज्या शक्ती आहेत त्यांना देव मानतो व हे आमच्या देव्हार्यातही आहेत. यात एक इर म्हणूनही आहे.
याचा अर्थ आमच्या घराण्यातील किंवा कुळातील जो पूर्वज असतो त्याला देव मानले जाते व तो घरातील देव्हार्यात असतो. तसाच आमचा महादेव हा आमच्या कूळीचा मूळपुरुष म्हणून ओळखला जातो. तो आमचा देव आहे, असे आमचे पूर्वजही सांगत आलेत. परंतु काही मंडळी बिरसा ब्रिगेड बाबत संभ्रम निर्माण करत आहेत. तसेच वारकरी म्हणजे भागवत धर्मास आमचा अजिबात विरोध नाही. कोठेही विरोध केला नाही. एखाद्या अखंड हरिनाम सप्ताहास विरोध केला आहे, असे उदाहरण दाखवून द्यावे.
उलटपक्षी बहुजन समाजासाठी पुरोगामी विचारांच्या चळवळीस आमचा कायम पाठिंबा असणार आहे. आमचा शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांनी चालनार्या म्हणजे संभाजी ब्रिगेड, आंबेडकरवादी, सारख्या संघटनांसोबत कायम अग्रस्थानी असतो. मात्र भागवत धर्म असो, वा कोणताही पंथ संप्रदाय. ही आदिवासी संस्कृती नाही तर आदीवासी संस्कृतीतुन तुकाराम महाराजांनी जे तत्वज्ञान समाजाच्या उद्धारासाठी भागवत धर्मातुन मांडले आहे.
ज्या मनुस्मृतीच्या कर्मकांडाच्या वर्णव्यवस्थेतुन बहुजन समाजाला बाहेर काढणारे नामदेव महाराजांचा भागवत धर्म हा बहुजन समाजासाठी अत्यंत चांगला आहे. त्यास आमचा विरोध नाही. मात्र तो धर्म वा कोणताही पंथाचा आणि आदिवासी संस्कृतीचा काहीही संबंध नाही. आम्ही हिंदू धर्माच्या वर्णव्यवस्थेत मोडत नाही. त्यामुळे त्यावेळच्या कर्मकांड वा जातिभेदाचा आणि आमचा सबंध नाही. कारण सुप्रीम कोर्टाच्याही पीटिशन क्र.10367 च्या 5 जानेवारी 2011 च्या निर्णयानुसार आदिवासी हिंदू नाहीत.
तसेच 1955 च्या हिंदू मैरेज अॅक्टचा व आमचा काहीही सबंध नाही. तसेच 1871 पासून 1941 पर्यंतच्या दर दहा वर्षांनी होणार्या जनगणनेत आदिवासी म्हणूनच नोंद करण्यात आली आहे. मात्र आता हिंदूकरण करण्याचा प्रयत्न काही संघट्ना व पक्षांकडून करण्याचा प्रयत्न असतो. त्यांचाच हा भाग असून आमचे आदीवासी पुढारी ही तीच भाषा बोलू लागले आहेत. तसेच राज्यघटनेच्या अनुच्छेद 244 अंतर्गत आदिवासी क्षेत्र असून येथे कोणत्याही धर्माचा प्रचार प्रसार करता येत नाही. मात्र हे राजरोसपणे चालू आहे. यावर कोणी बोलत नाही. मात्र आम्ही आदीवासी संस्कृती जतन करण्यास सांगितले तर चुकीचा संभ्रम जाणीवपूर्वक पसरवला जातो.
झारखंड हायकोर्टाच्या पीआयएल 6884/2002 निर्णयाने स्पष्ट केले आहे की, जरी इतर धर्म स्विकारला असला तरी जे आदिवासींचे आरक्षण आहे ते त्यांनी संस्कृती, भाषा, परंपरा टिकवून ठेवली आहे. त्यामुळे आरक्षण अबाधित आहे. त्याचप्रमाणे 2017 साली झालेल्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्याकडून झालेल्या सर्वेवेळी आदिवासींचे देव दैवते व चालिरिती विचारल्या जात होत्या. आज ही जातपडताळणीसाठी आदिवासींचे देव, दैवते, कुळसाया विचारल्या जातात. तिथे ही राजकीय मंडळी वाघोबा वरसुबाई, कळसुबाई, बहिरोबा सोडून इतर देव देवतांचे नाव लिहायला सांगणार आहेत का?
आदिवासी हिंदू नाहीत, असे आदिवासी संस्कृती जतन करा. असे आदिवासींना पूर्वी सांगणारे आदिवासी नेते पक्ष बदलून गेल्यावर राजकीय अजेंड्याप्रमाणे स्वतःच्या फायद्यासाठी आदिवासींना हिंदू धर्माचे सांगू लागले आहेत. व सोईस्कर भूमिका घेतली जाते.
राजकीय फायदा पाहिला जातो. बिरसा ब्रिगेड कोणत्याही पक्षास बांधील नाही किंवा कोणी गृहीत धरु नये. आदिवासी समाजाची ही बिरसा ब्रिगेड संघटना आहे. ही समाज म्हणूनच राहणार असल्याचा दावाही त्यांनी व्यक्त केला.
QPHDKVbcr