जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक तयारी । शेवगाव तालुक्यात काकडे दांम्पत्यांच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी
शेवगाव । वीरभूमी - 08-Jan, 2022, 06:49 AM
शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या हर्षदाताई काकडे या लोळेगाव येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी जात असतांना रस्त्यांच्या बाजुला असलेल्या शेतात काही महिला कांदा लागवड करतांना दिसल्या. जि. प. सदस्या सौ. काकडे यांनी शेतकरी महिलांबरोबर संवाद साधत कांदा लागवड करुन कांदा लागवडीचा अनुभव घेतला.
शेवगावला नगरपालिका झाल्यानंतर एक गट व दोन गण कमी झाले होते. मात्र जिल्हा परिषदेचे एकुण गट संख्या वाढणार असल्याने शेवगाव तालुक्यातही एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गण वाढणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये इच्छुकांची संख्या वाढणार आहे.
थोड्याच दिवसात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यानंतर होणार्या निवडणुकांसाठी नेते मंडळी आपआपल्या पद्धतीने तयारीला लागली आहेत. त्यातच मागील निवडणुकीच्यावेळी भाजपाने तिकिट नाकारल्याने जि. प. सदस्या हर्षदाताई काकडे यांनी जनशक्ती मंचच्या माध्यमातून अपक्ष उमेदवारी करत विजय मिळवला होता.
या अगोदर जि. प. सदस्या हर्षदा काकडे यांनी शेवगाव तालुक्यातील वेगवेगळ्या गटातून निवडणूक लढवत विजय मिळवलेला आहे. मागील निवडणुकीत ऐनवेळी भाजपाने तिकिट नाकारल्याने गेली पाच वर्ष जि. प. सदस्या हर्षदा काकडे यांनी वेळ पाहुन पक्षीय भुमिका ठेवल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेत सत्ता बदल झाला असला तरी जि. प. सदस्या हर्षदा काकडे यांनी सत्ताधार्यांच्या बाजुने राहात मोठा निधी मिळवत विकासकामे मार्गी लावली आहेत.
या निवडणुकीसाठी तालुक्यात एक जिल्हा परिषद वाढणार असून अद्याप कोणत्या गटासाठी कोणते आरक्षण असणार याबाबत प्रतिक्षा करावी लागणार आहे. यामुळे निवडणुकीसाठीची तयारी करतांना इच्छुकांनाही अडचण होत आहे. त्यातच पारंपारिक विरोधक असलेले घुले आणि मागील वेळी भाजपाने तिकिट नाकारल्याने दुरावलेले काकडे दांम्पत्य या निवडणुकीला शेवगाव तालुक्यातील सर्वच जिल्ह परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये जनशक्ती मंचच्या माध्यमातून राष्ट्रवादी व भाजपाला शह देण्याची तयारी करत आहेत.
यामुळे जनशक्ती मंचचे सर्वेसर्वा अॅड. शिवाजीराव काकडे व जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे हे शेवगाव तालुक्यातील प्रत्येक गावात जावून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. अशाचप्रकारे तालुक्यातील लोळेगाव येथे कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी जात असतांना जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे यांना रस्त्याच्या बाजुला असलेल्या शेतात काही महिला शेतकरी कांदा लागवड करतांना दिसल्या.
यावेळी जि. प. सदस्या हर्षदाताई काकडे यांनी महिला शेतकर्यांशी संवाद साधत कांदा लागवडीसाठी पाण्याने भरलेल्या वाफ्यामध्ये उतरून जि. प. सदस्या काकडे यांनी महिलांसमवेत कांदा लागवडीचा अनुभव घेतला. या कांदा लागवड अनुभवाचे फोटो त्यांनी स्वतःच्या सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. सोशल मीडियावर अपलोड केलेल्या फोटोला अनेकांनी लाईक केले असून सौ. काकडे यांच्या कांदा लागवड अनुभवाचे कौतूक केले आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सौ. हर्षदाताई काकडे यांनी वेगवेगळ्या गटातून निवडणूक लढवत मिळवलेल्या अनुभवावर शेवगाव तालुक्यातील सर्वच गट व गणांवर विजय मिळवता येण्यासाठी सुरू केलेली तयारी किती यशस्वी होईल हे पहावे लागणार आहे.
Comments