श्रीगोंदा गटातून शिंदेशाही की भोसगीरी?
नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणूक
विजय उंडे । वीरभूमी- 09-Jan, 2022, 10:18 AM
श्रीगोंदा : नागवडे कारखान्याच्या निवडणुकीतील सर्वात चर्चिला जाणार्या श्रीगोंदा गटातून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस, अॅड. बापुसाहेब भोस, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष जिजाबापू शिंदे व दुसरे माजी उपाध्यक्ष सुभाष शिंदे उमेदवार आहेत. एकूण 13 गावांचा समावेश असलेल्या गटात पात्र सभासद मतदारांची संख्या 3,184 आहे. जिरायत उमेदवार विरुद्ध बागायत उमेदवार यांच्यातील लढत लक्षणीय होणार आहे.दोन्ही पॅनलने एक शिंदे व एक भोस असे झिक्झॅक उमेदवार दिल्याने या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. माजी उपाध्यक्ष केशवराव मगर यांनी बापूंच्या निधनानंतर राजेंद्र नागवडे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप करत बंडाचा झेंडा उभारला त्यावेळी सर्वात आधी जिजाबापू शिंदे यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावला. तर सुरुवातीला एकाकी वाटणार्या राजेंद्र नागवडे यांना बाबासाहेब भोस यांनी साथ दिल्याने नागवडे गटाला नवसंजीवनी मिळाली.
मगर-पाचपुते यांच्या बाजूने तालुक्यातील जवळपास सर्वच दुसर्या फळीतील नेत्यांनी कंबर कसली आहे. तर नागवडे गटाचा लोकप्रिय चेहरा म्हणून बाबासाहेब भोस यांच्या खांद्यावर जबाबदारी आली आहे. 1984 साली पहिल्यांदा कारखान्यात बबनराव पाचपुते यांनी सत्ताबदल केला. पाचपुते यांचे उजवे हात जिजाबापू शिंदे यांच्यासह बापूंनी अनेक संचालक फोडून पाचपुते यांचे सह्यांचे अधिकार काढून जिजाबापू शिंदे यांना उपाध्यक्ष करत सह्यांचे अधिकार मिळवून देत अप्रत्यक्ष अध्यक्ष केले. त्यानंतरच्या झालेल्या निवडणुकीत बापूंनी जिजाबापू शिंदे यांचेच तिकीट कापल्याने जिजाबापू शिंदे यांचा राजकीय प्रभाव मावळला.
त्यानंतर जिजाबापू यांनी परत पाचपुते यांचा हात धरत दोनवेळा संचालक पद मिळवले. कारखान्याच्या इतिहासात मढेवडगावच्या जिजाबापू शिंदे व सुभाष शिंदे या चुलत भावांनी एकाचवेळी एकमेकांच्या विरोधात लढत दोघेही निवडून येण्याचा करिष्मा केल्याने त्यांच्यावर आतून तह केल्याचा आरोप होऊ लागला. आता याही निवडणुकीत दोन्ही भाऊ एकमेकांविरोधात ठाकले आहेत. यामुळे सभासदांमध्ये पुन्हा पुनरावृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 1997 पासून सलग चारवेळा संचालकपद मिळविण्याचा विक्रम सुभाष शिंदे यांनी केला तर पाचव्यांदा उमेदवारी देऊन त्यांच्यावर राजेंद्र नागवडे यांनी पुन्हा विश्वास दाखवला आहे.
कारखाना स्थापन झाल्यापासून होणार्या प्रत्येक उपाध्यक्षाचे बंड सर्वश्रुत आहे. परंतु उपाध्यक्ष म्हणून संधी मिळालेले सुभाष शिंदे यांना गहिर्या निष्ठेमूळे परत परत संधी मिळत गेली. परंतु नव्यांना संधी मिळत नसल्याने राजेंद्र नागवडे यांच्यावर परिसरातील छोटी गावे नाराज आहेत. 2008 सालच्या निवडणुकीत बाबासाहेब भोस यांनी बापूंना साथ देत संचालकपद मिळविले. परंतु बागायती पट्ट्यातील संचालकांनी केशवराव मगर यांचे लॉबिंग केल्याने भोस यांचे व्हाईस चेअरमनपद हुकले. आज परत एकदा बाबासाहेब भोस यांनी राजेंद्र नागवडे यांना पडत्या काळात साथ दिल्याने बाबासाहेब यांचा परत ‘मामा’ करू नये ही सभासदांची तळमळ आहे.
मगर-पाचपुते गटाचे दुसरे उमेदवार अॅड. बापूसाहेब भोस नवखे आहेत. पण सुरुवातीपासून मगर यांच्याबरोबर राहत मगर यांना कायद्याच्या लढाईत सर्वोतोपरी मार्गदर्शन करत आहेत. श्रीगोंदा गटातील श्रीगोंदा 876, म्हातारपिंप्री 273, मढेवडगाव 573, घुगलवडगाव 27, बेलवंडी कोठार 21, वडाळी 49, देऊळगाव 33, टाकळी लोणार 145, बाबुर्डी 198, भानगाव 182, पिसोरेखांड 89, तांदळी दुमाला 241, पारगाव सुद्रीक 477 अशी एकूण 3,184 सभासद मतदारांच्या शिक्क्यावर वरील उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असून क्रॉस व्होटिंग रोखण्यासाठी नेत्यांचे कसब पणाला लागणार आहे.
YvdgieUXLyEfImVN