जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांचे इतरत्र होणारे बांधकाम भोवले
अहमदनगर । वीरभूमी- 11-Jan, 2022, 10:00 AM
शेवगावचे तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी तथा भातकुडगाव (ता. शेवगाव) येथील बीट शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ कराड व बोधेगावचे केंद्रप्रमुख रामराव गिताराम ढाकणे या दोघांवर तात्पुरते निलंबनाची कारवाई जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सोमवारी (दि. 10) केली. या घटनेने जिल्ह्यासह शेवगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील जिल्हा परिषद शाळेसाठी दोन वर्ग खोल्या मंजूर करण्यात आल्या होत्या. या दोन वर्ग खोल्यांचे बांधकाम जिल्हा परिषदेच्या जागेऐवजी विनापरवाना इतर मालकीच्या जागेत सुरू होते. जिल्हा परिषद जागेऐवजी इतर ठिकाणी सुरू असलेल्या वर्ग खोल्यांचे काम बंद करण्याबाबत काही ग्रामस्थांनी हरकत घेतली होती.
याबाबत जिल्हा परिषदेकडे तक्रारीही करण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषद शाळेकरीता दोन वर्गखोल्यांचे बांधकाम जिल्हा परिषदेच्या जागेऐवजी विनापरवाना इतर मालकीच्या जागेत सुरू असताना वेळीच सदर बाब निदर्शनास आणून न दिल्याचा ठपका ठेवत प्रभारी गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड व बोधेगाव केंद्र पमुख रामराव ढाकणे यांच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली.
निलंबनाच्या कालावधीत दोघांनाही नेवासा पंचायत समिती येथे रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र जि. प. सेवा ( वर्तणूक ) नियम 1967 च्या 3 भंग केला असल्याने त्यांच्याविरोधात शिस्तभंग कारवाई करीत असल्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी आदेशात म्हटले आहे.
तसेच निलंबनाच्या काळात कोणतीही खाजगी नोकरी अथवा व्यवसाय करू नये अन्यथा दोषारोप ठेवले जातील. तसेच त्यांना निलंबन निर्वाह भत्ता देण्याची जबाबदारी शेवगावच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांच्यावर सोपविण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.
klZIgysAjqpDHm