विजय उंडे । वीरभूमी- 11-Jan, 2022, 10:27 AM
श्रीगोंदा ः विसापूर तलावाच्या सिंचनावर बेलवंडी येथे डहाणूकर यांनी खाजगी कारखाना काढला. शेती महामंडळ व परिसरातील बागायतदारांच्या जीवावर छोट्याशा कारखान्यामुळे परिसरात समृद्धी आली. 60 च्या दशकात सहकाराचे वारे संपूर्ण राज्यात घुमू लागले.
त्यावेळच्या तालुक्यातील गावकारभार्यांनी सहकारी कारखान्याची चळवळ सुरू करून अडचणीत आलेल्या डहाणूकर यांचा कारखाना विकत घेऊन ढोकराईच्या माळावर श्रीगोंदा सहकारी कारखान्याची उभारणी केली.
कुकडी प्रकल्पाने परिसराचा कायापालट केल्याने ऊस, कांदा, फळशेतीने मळे बहरू लागले. नागवडे कारखान्याच्या सत्तेत बेलवंडी गावचे कारभारी इथापे, शेलार, पितळे, हिरवे, काळाणे, लबडे या बागायतदारांनी आळीपाळीने परिसरात वर्चस्व गाजवले. तर रायकर, कोळपे यांनी हंगेवाडीची धुरा सांभाळली. लोणीतील काकडे कंपनीने शिवाजीराव नागवडे व बबनराव पाचपुते या दोघांनाही साथ दिली. बेलवंडी गावाचा सर्वसामान्य माणूस आण्णासाहेब शेलार ग्रामीण ढंगाचे वक्तृत्व, सहज कुठेही मिळून मिसळून राहणारा ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून श्रीगोंद्याच्या राजकारणात उदयास आला.
बबनराव पाचपुते यांचा कट्टर माणूस बबनदादांमूळे दोनवेळा संचालक व जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष झाला. गुरू बबनरावांशीच बंड करत त्यांच्याच विरुद्ध विधानसभा लढवून मोठे आव्हान दिले पण जातीच्या राजकारणात अडकल्याने मर्यादा आल्या. शिवाजीराव नागवडे यांच्याबरोबर येऊन परत संचालकपद मिळविले व विखे यांच्याशी निष्ठा दाखविल्याने दुसर्यांदा जिल्हा परिषद उपाध्यक्ष व जिल्हा काँग्रेस अध्यक्षपद मिळविले.
राहुल जगताप यांना आमदार होण्यासाठी सर्वात जास्त परिश्रम घेतले. आज केशवराव मगर यांना साथ देत स्टार प्रचारक म्हणून सहकार पॅनलची संपूर्ण मदार अंगावर घेत भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करत नागवडे गटाला सळो की पळो करून सोडले आहे. परंतु कारखान्याच्या निवडणूकीवरच अण्णासाहेब शेलार यांचे भविष्यातील राजकारण अवलंबून राहणार आहे.
बेलवंडी गटातून सर्वसाधारण मतदारसंघातून तीन संचालक निवडण्यात येणार असून किसान क्रांती पॅनलचे लोणी व्यंकनाथ येथील शिक्षक असलेले दत्तात्रय काकडे, हंगेवाडीचे लक्ष्मण रायकर, बेलवंडीचे भीमराव लबडे तर सहकार पॅनलचे लोणीचे विकास काकडे, हंगेवाडीचे तुळशीराम रायकर व बेलवंडी येथील आण्णासाहेब शेलार यांच्यात सर्वाधिक मते घेण्यासाठी चुरस रंगणार आहे. तुळशीराम रायकर दुसर्यांदा संचालक होण्यासाठी नशीब आजमावत आहेत.
3415 सभासद असलेल्या या गटात 20 गावातील मतदार आहेत. यातील सात गावात एकेरी संख्या असलेले मतदार तर सहा गावात दुहेरी संख्येचे मतदार आहेत. सर्वाधिक मतदार संख्या बेलवंडी, लोणी व्यंकनाथ, चिंभळे-हंगेवाडी या गावात असून लक्षणीय संख्येत असणार्या ओबीसी मतांवरच भावी संचालकपद अवलंबून आहे.
Comments