राहुरी । वीरभूमी- 13-Jan, 2022, 03:04 PM
राहुरी येथील दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून तीन महिलांची सुटका करण्यात आली. तर दोन जणांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
ही धडाकेबाज कारवाई पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने बुधवारी रात्री केली. या कारवाईने राहुरी तालुक्यातील अवैध व्यवसाय करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, राहुरी येथील हॉटेल न्यू भारत तसेच राहुरी ते शिर्डी रोडवरील हॉटेल न्यू प्रसाद शेजारी काही महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेण्यात येत असल्याची माहिती डिवायएसपी संदीप मिटके यांना समजली. या माहितीची खात्री पटल्यानंतर डिवायएसपी संदीप मिटके यांनी दोन्ही ठिकाणी एकाचवेळी पंचासमक्ष पथकांसह छापा टाकला.
यामध्ये राहुरी येथील न्यू भारत हॉटेलमध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये एका महिलेची सुटका करून एकाला अटक केली. याप्रकरणी महिला पोना. स्वाती कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सय्यद फरहाद इरशाद अहमद (वय 34, रा. बुवासिंद बाबाचा दर्गा समोर, राहुरी) याच्याविरूद्ध राहुरी पोलिस ठाण्यात स्त्रीयांच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्या घटनेत राहुरी ते शिर्डी मार्गावरील हॉटेल न्यू प्रसाद शेजारी सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून दोन महिलांची सुटका केली तर एकाला अटक केली. या प्रकरणी महिला पोकाँ. मीना नाचन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राजू शिवाजी इंगळे (रा. इंदिरानगर, वार्ड नं. 6, श्रीरामपूर) याच्या विरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात स्त्रीयांच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकाचवेळी दोन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने डिवायएसपी संदीप मिटके यांनी पथकासह छापा टाकल्याने राहुरी शहरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. तर सर्व सामान्यांमधून या कारवाईचे स्वागत होत आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, डॉ. दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली डिवायएसपी संदीप मिटके, पोनि. मधुकर साळवे, पोकॉ. नितीन शिरसाठ, आजिनाथ पाखरे, सचिन ताजणे, गणेश फाटक, इफ्तेकार सय्यद, चालक पोकॉ. चानद सय्यद, महिला पोना. स्वाती कोळेकर, महिला पोकाँ. मीना नाचन यांच्या पथकाने केली.
BNhXOojbfSq