करंजी । वीरभूमी- 16-Jan, 2022, 09:55 PM
तिसगावच्या पाण्यासाठी 40 वर्षापासुन संघर्ष करत आलो आहे. तिसगावचा पाणीप्रश्न सुटावा यासाठी तुमच्या मागे राहीलो. आता सर्व योग जुळून आले आहेत. तेव्हा सर्वस्व पणाला लावून तिसगावकरांना पाणी द्या, अशी कळकळीची विनंती तिसगावचे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचेकडे केली.
जलजीवन मिशन अंतर्गत ब्राम्हणी आणि वांबोरी गावांचा समावेश होवून कोट्यावधी रुपयांच्या पाणी योजना मंजूर झाल्या. मात्र तिसगावला पुन्हा एकदा काहीच न मिळाल्याने सरपंच काशिनाथ पाटील लवांडे यांनी तिसगाव येथील कब्रस्तानच्या संरक्षण भिंतीचे लोकर्पण व कृषी केंद्राचे उद्घाटनासाठी उपस्थित असलेल्या राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. प्रताप ढाकणे हे होते. यावेळी अॅड. मिर्झा मनियार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, उद्धव वाघ, संभाजी पालवे, कुशल भापसे, बंडू बोरुडे, अमोल वाघ, वैभव दहिफळे आदी उपस्थित होते.
सरपंच काशिनाथ पाटील लवांडे म्हणाले की, 40 वर्षापासून संघर्ष करत असलेल्या तिसगावचा पाणीप्रश्न मार्गी लावला तर पक्ष, जात, धर्म सर्व सोडून आम्ही तुमच्या मागे राहु पण आम्हाला पाणी द्या. पाण्यासाठी बबनराव ढाकणेंच्या आंदोलनात सहभागी होउन 16 दिवस जेलमध्ये राहीलो. बाळासाहेब विखे व गोपीनाथ मुंडे यांनी प्रयत्न करून वांबोरी चारीचे पाणी थोड्या फार प्रमाणात आनले. राज्यात पुन्हा सरकार आल्याने आता आशा पल्लवीत झाल्या आहेत.
पुढे लवांडे म्हणाले, या परिसरात 40 वर्षापुर्वी साखर कारखाना आला. त्यानंतर काहीच झाले नाही. त्यामुळे आता एमआयडीसी सारखे प्रकल्प होणे गरजेचे आहे. पाणी आले तर ऊसतोड कामगार कमी होतील, असे वाटले. पाणी आले नाही व कोयता काढता आला नाही. आजही पाणी नसल्याने शेती उत्पन्न व खर्च मेळ बसत नसल्याचे लवांडे म्हणाले.
यावर राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे म्हणाले, मिरी-तिसगाव पाणी योजनेतुन पांढरीपुल ते तिसगाव अशी जमीनीवर स्वतंत्र पाईपलाईन टाकुन तिसगावला पाणी देण्याचे नियोजन केले जात आहे. आपल्यामुळेच आमदार व मंत्री आहे. त्यामुळे वीज, पाणी प्रश्न निश्चित मार्गी लावणार. वीज प्रश्न येत्या आठ दिवसात मार्गी लागणार आहे व पाण्याचे नियोजन ही चालु असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगीतले.
Comments