पारनेर । वीरभूमी- 18-Jan, 2022, 10:50 PM
इतर मागासवर्गीय आरक्षणामुळे रखडलेल्या पारनेर नगरपंचायतीच्या चार प्रभागांची निवडणूक आज अतिशय चुरशीने झाली. पारनेर नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी मंगळवारी दिवसभर मतदान सुरळीतपणे पार पडले असून या चार प्रभागांसह एकूण 87.66 टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सविता कुमावत यांनी दिली.
चार जागांसाठी जोरदार प्रचार झाल्यामुळे मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. चार प्रभागासाठी पाच मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले असून 2 हजार 811 पैकी 2 हजार 464 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या चार प्रभागातील निवडणुकांमध्ये किरकोळ प्रकार वगळता मंगळवारी दिवसभर पोलीस बंदोबस्तात शांततेत निवडणूक पार पडली.
आज मतदानाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यासह माजी आमदार विजय औटी, भाजपाचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, सभापती गणेश भोसले, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, शहर विकास आघाडीचे चंद्रकांत चेडे, अर्जुन भालेकर यांनी या चार प्रभागातील मतदार केंद्रावर ठाण मांडले होते. पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनात सपोनि. हनुमंत उगले यांच्यासह पारनेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
मतमोजणीच्या तीन फेरी - बुधवारी सकाळी 10 वा. पारनेर बाजारतळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात तीन फेर्यांमध्ये सात टेबलांवर मतमोजणी होणार आहे. पहिल्या फेरीत सात टेबलांवर प्रभाग 1/1, 2/1, 3/1, 4/1, 9/1, 12/1, 15/1 ची मोजणी होणार आहे.
दुसर्या फेरीत प्रभाग 5/1, 2/2, 3/2, 4/2, 9/2, 13/1, 16/1 तर तिसर्या फेरीत प्रभाग 6/1, 7/1, 8/1, 10/1, 11/1, 14/1, 17/1 अशी मतमोजणी होणार आहे.
NoAWgCBQcY