श्रीगोंदा । वीरभूमी- 18-Jan, 2022, 10:58 PM
नुकतीच बिनविरोध निवडणूक पार पडलेल्या कर्मयोगी कुंडलीकराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार राहुल जगताप यांची तर उपाध्यक्षपदी विवेक पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कुकडी कारखान्याच्या कार्यालयात मंगळवार दि.18 रोजी या निवडी पार पडल्या.
निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी संचालकांना अर्ज करण्यासाठी सूचना केल्या. चेअरमन पदासाठी माजी आमदार राहुल जगताप यांचा व व्हाईस चेअरमन पदासाठी विवेक पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक बिनविरोध झाली असे जाहीर केले.
यावेळी उपस्थित सर्व सभासदांनी एकच जल्लोष केला. दिग्विजय आहेर यांना सहाय्यक उपनिबंधक अभिमान थोरात साहेब यांनी मदत केली.
नविन पदाधिकार्यांचे अभिनंदन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार म्हणाले की, आम्ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शब्द दिला होता की, पिंपळगाव पिंसा येथील कुकडी सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची निवडणुक बिनविरोध करणार. तो शब्द आज खरा ठरला. कुकडी कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व नवनिर्वाचित संचालक मंडळाने जबाबदारीने काम करून सभासदांच्या विश्वासाला आणखी बळकटी द्यावी. बिनविरोध निवडणुकीत काही मान्यवर इच्छुकांना थांबावे लागले त्यांना तोलामोलाची संधी मिळावी.
निवडीनंतर विद्यमान नवनिर्वाचित चेअरमन राहुल जगताप म्हणाले, आदरणीय स्व. तात्यांच्या नंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने कारखान्याच्या सर्व सभासदांनी व कुकडी कारखान्यावर प्रेम करणार्या सर्व मंडळींनी चेअरमनपदाची धुरा देऊन माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे. त्या विश्वासाला कधीही तडा जाऊन देणार नाही. तात्यांच्या आशीर्वादाखली नेहमी शेतकरी, सभासद व कारखाना हीत पाहणार आहोत.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व बिनविरोध निवडणुकीसाठी घनश्याम आण्णा शेलार, आमदार बबनराव पाचपुते, राजेंद्र नागवडे, दिनूकाका पंधरकर, ईश्वरे गुरुजी, अॅड. बाळासाहेब पवार व शेकडो कारखाना हीत जपणार्या सभासदांनी मदत केली आहे, त्या सर्वांचे मनापासून आभार.
यावेळी नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन विवेक पवार म्हणाले, आमचे नेते राहुलदादा जगताप व सर्व संचालकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून कामातून संधीचे सोने करणार आहे.
यावेळी गुरुदेव महिला पंतस्थेच्या माजी चेअरमन अनुराधा (आक्का) जगताप, गुरुदेव महिला पंतस्थेच्या विद्यमान चेअरमन व कारखाना संचालक डॉ. प्रणोती जगताप, श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसंरपच, पदाधिकारी, कारखान्याचे आजी-माजी संचालक मंडळ, सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
MCLJutVAS