कर्जत नगरपंचायतीच्या चार प्रभागासाठी सरासरी 87.05 % मतदान
बुधवारी मतमोजणी । सत्ता कायम की सत्तातंर?
कर्जत । वीरभूमी- 18-Jan, 2022, 11:06 PM
कर्जत नगरपंचायतीच्या चार प्रभागासाठी सरासरी एकूण 87.05 टक्के शांततेत मतदान पार पडले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिली.यावेळी चार प्रभागाच्या पाच मतदान केंद्राना अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश वायचळ यांनी भेट देत पाहणी केली. बुधवार, दि. 19 रोजी सकाळी 10 वाजता तहसील कार्यलयाच्या आवारात 17 जागेची मतमोजणी आठ टेबलवर दोन फेरीत पार पडणार आहे.
कर्जत नगरपंचायतीच्या उर्वरीत चार प्रभागासाठी मंगळवार, दि. 18 रोजी मतदान प्रकिया पार पडली. या चार प्रभागातील एकूण 3 हजार 320 मतदारांपैकी 2 हजार 890 मतदारांनी आपला हक्क बजावला. यामध्ये पुरुष 1 हजार 513 तर 1 हजार 377 स्त्री मतदारांनी मतदान केले.
पाच ही मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिली. मतदान प्रक्रिया शांततेत आणि निर्भीडपणे पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
चार प्रभागातील मतदार केंद्राना माजीमंत्री राम शिंदे यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यासह जिल्हा प्रशासनाकडून अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश वायचळ, प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी मतदान केंद्राची पाहणी करत आढावा घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ थोरबोले यांना सहायक म्हणून तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्यासह भरारी पथकातील अधिकार्यांनी सहकार्य केले.
प्रभाग क्रमांक आणि मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे : प्रभाग क्रमांक 1 गायकरवाडी - 673 पैकी 656, 97.47%. प्रभाग क्रमांक 3 ढेरेमळा- 1127 पैकी 979 , 87.02% . प्रभाग क्रमांक 5 पोस्ट ऑफिस परिसर - 734 पैकी 622, 84.74% तर प्रभाग क्रमांक 7 बुवासाहेब नगर 786 पैकी 633, 80.53% मतदान संपन्न झाले.
चार जागेसाठी एकूण सरासरी 87.05 % मतदान पार पडले. बुधवार, दि. 19 रोजी सकाळी 10 वाजता कर्जत तहसील कार्यालयाच्या आवारात 17 जागेसाठी आठ टेबलवर दोन फेरीत मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी 11 वाजता कर्जत नगरपंचायतीचे निकाल स्पष्ट होईल अशी माहिती तालुका प्रशासनाकडून देण्यात आली.
प्रभाग क्रमांक 3 आणि 7 मध्ये तिरंगी लढती पहावयास मिळाली. यामध्ये वंचित बहुजन आघाडी कोणाचे विजयाचे गणित बिघडवणार हे पाहणे म्हणत्वपुर्ण ठरणार आहे. तर प्रभाग क्रमांक 1 आणि 5 मध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीमध्ये सरळ लढती पहावयास मिळाली. पोस्ट ऑफिस परिसरातील लढतीकडे सगळ्याचे लक्ष लागले असून काँग्रेसचे घुले बंधूना आपला गड कायम राखण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.
कर्जत नगरपंचायतीवर भाजपा की राष्ट्रवादी?
कर्जत नगरपंचायतीच्या एकूण 17 जागेसाठी 13 हजार 636 मतदारांपैकी 11 हजार 164 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 17 जागेसाठी सरासरी एकूण 81.87 टक्के मतदान पार पडले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिली. कर्जत नगरपंचायतीवर भाजपा आपली सत्ता कायम राखणार की राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपला झेंडा फडकावणार याचे भवितव्य मतदारांनी मतयंत्रात बंद केले असून याचा उलगडा बुधवारी सकाळी 11 वाजता निकाल लागल्यावर समजेल.
eYKvouTOfPsMFmDX