पारनेर । वीरभूमी- 19-Jan, 2022, 02:27 PM
पारनेर नगरपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये मतदारांनी संमिश्र कौल दिल्यामुळे कोणत्याही पक्षाची एक हाती सत्ता पारनेर नगरपंचायतीवर येताना दिसत नसल्याने नगरपंचायत त्रिशंकू झाली आहे. या ठिकाणी सत्तेची चावी शहर विकास आघाडीच्या हातात गेली आहे.
विजयी उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 7, शिवसेना 6, शहर विकास आघाडी 2 भाजपा 1 व अपक्ष 1 असे उमेदवार विजयी झालेले आहेत. या निवडणुकीत आमदार निलेश लंके व माजी आमदार विजयराव औटी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी, शिवसेनेला शहर विकास आघाडीची साथ घ्यावी लागणार आहे. सध्या तरी पारनेर नगरपंचायतीच्या सत्तेची दोरी शहर विकास आघाडीच्या उमेदवरांच्या हाती असल्याचे बोलले जात आहे.
पारनेर नगरपंचायतीत प्रभाग 1- ठाणगे कांतीलाल शालुबाई (शिवसेना), प्रभाग 2 - सुप्रिया सुभाष शिंदे (राष्ट्रवादी), प्रभाग 3 - योगेश अशोक मते (अपक्ष), प्रभाग 4 - नवनाथ तुकाराम सोबले (शिवसेना), प्रभाग 5 - नितीन रमेश अडसूळ (राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष), प्रभाग 6 - निता विजय औटी (राष्ट्रवादी), प्रभाग 7 - विद्या अनिल गंधाडे (शिवसेना), प्रभाग 8 - भूषण उत्तम शेलार (शहर विकास आघाडी), प्रभाग 9 - हिमानी रामजी नगरे (राष्ट्रवादी), प्रभाग 10 - सुरेखा अर्जुन भालेकर (शहर विकास आघाडी), प्रभाग 11- अशोक फुलाजी चेडे (भाजपा), प्रभाग 12 - विद्या बाळासाहेब कावरे (राष्ट्रवादी), प्रभाग 13 - विजय सदाशिव औटी (राष्ट्रवादी), प्रभाग 14 - निता देवराम ठुबे (शिवसेना), प्रभाग 15 - जायदा राजू शेख (शिवसेना), प्रभाग 16 - युवराज कुंडलिक पठारे (शिवसेना), प्रभाग 17 - प्रियांका सचिन औटी (राष्ट्रवादी) असे उमेदवार विजयी झाले.
पारनेरमध्ये शिवसेनेच्या उमेदवार माजी आमदार विजय औटी यांच्या पत्नी व माजी उपसभापती जयश्री औटी यांचा राष्ट्रवादीच्या हिमानी बाळासाहेब नगरे या नवख्या उमेदवाराने 10 मतांनी पराभव केला. शिवसेना शहर प्रमुख निलेश खोडदे यांच्या पत्नी स्वाती खोडदे या 2 मतांनी पराभूत झाल्या. तर नगरसेवक नंदकुमार औटी यांच्या पत्नी मयुरी औटी या 6 मतांनी पराभूत झाल्या.
माजी उपसरपंच विजय डोळ हे 13 मतांनी पराभूत झाले. पहिल्या पंचवार्षिक मधील पुन्हा निवडणुकीला उभे राहिलेल्या सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवकांचा पराभव झाला असून फक्त सुरेखा अर्जुन भालेकर या एकमेव विद्यमान नगरसेविका पुन्हा निवडून आल्या आहेत.
Comments