त्या बांधकाम प्रकरणी शेरेबुक मध्ये चुकीचा शेरा देणारे दोषीच
रामजी अंधारे यांचा आंदोलनाचा इशारा । उर्वरित पदाधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
बोधेगाव । वीरभूमी- 20-Jan, 2022, 08:57 AM
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या दोन वर्ग खोल्यांचे बांधकाम विनापरवानगी जिल्हा परिषदेची जागा सोडून इतर मालकीच्या जागेत केल्याप्रकरणी चार बड्या अधिकार्यांचे निलंबन करण्यात आले आहे. मात्र वर्ग खोल्या प्रकरणात शिक्षण अधिकार्यांचा संबंध काय? असे म्हणने मुख्य कार्यकारी आधिकारी यांना देण्यात आले असून या प्रकरणात शिक्षण विभागाचा संबंध नसल्याचे दाखवण्यात आले आहे.परंतु प्रभारी शिक्षणाधिकारी रामनाथ कराड यांनी बोधेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असता शेरे बुक मध्ये शालेय व्यवस्थापना बरोबर नवीन शाळा वर्ग खोल्याचे लेंटल लेव्हल पर्यंत काम झाल्याचे नमूद केले आहे. यावरून शिक्षण विभागाला या सगळ्या प्रकरणाची माहिती असल्याचे स्पष्ट होते. यामुळे या अनधिकृत वर्ग खोल्या प्रकरणाचा निपटारा लागेपर्यंत कुणालाही सोडण्यात येउ नये. तसेच उर्वरित पदाधिकार्यांची देखील चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. असे न झाल्यास ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर येत्या 26 जानेवारी रोजी एकाच वेळी आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच रामजी अंधारे यांनी दिला आहे.
अनधिकृत जागेत बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या वर्ग खोल्या प्रकरणात जिल्हा परिषद सेवा (वर्तणूक) नियम 1967 चा भंग केल्याने या दोघांवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये प्रभारी गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड, बोधेगाव जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख रामराव ढाकणे, शेवगाव पंचायत समितीचे पाटबंधारे विभागाचे उपविभागाचे शाखा अभियंता जयेंद्र पट्टे, बोधेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक राजाराम काटे यांचा समावेश आहे.
तालुक्यात मुख्य बाजरपेठेचे गाव म्हणून बोधेगावची ओळख आहे. सन 1858 ची तालुक्यातील जुनी इंग्रजकालिन प्राथमिक शाळा आहे. शिक्षणातील गावाचा प्राण म्हणून ओळखल्या जाणार्या या शाळेच्या जागेवर गाळे बांधण्याचा डाव असल्याचे बोलले जात असताना गावकर्यांनी तो उधळून लावला.
दरम्यान राजकारण्यांच्या आर्थिक लोभाच्या मुद्द्यापायी अधिकार्यांनी आलेल्या नवीन खोल्या अनाधिकृत जागेवर बांधण्यास सुरूवात केली. परंतु गावातील जाणकार मंडळींनी याबाबत चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड यांनी दिली. ही जागा अधिकृत असल्याचे गावकर्यांना भासवले. सदर जागेचे उतारे माजी सरपंच रामजी अंधारे यांनी काढले असता ती जागा जिल्हा परिषद मालकीची नसल्याचे निदर्शनास आले.
अंधारे यांनी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवली आणि आंदोलन करण्याचा इशारा दिला. जिल्हा परिषदेच्या जनरल मिटिंगमध्येही जि. प. सदस्यांनी हा मुद्दा लावून धरला. तेव्हा मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सदर काम बंद करण्याचे आदेश दिले व एक चौकशी समिती नेमली.
शाळा वाचवा असा संदेश गावाच्या सर्व सोशल मीडिया ग्रुपवर फिरला आणि प्रत्येकाच्या शाळेविषयी भावना जागृत झाल्या आणि आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. यादरम्यान एका तरुणांचे शिष्टमंडळ मुख्यकार्यकारी अधिकारी यांना देखील भेटले. ज्या अधिकार्यांनी आर्थिक लाभापायी हे केले असेल त्यांना निलंबित करा. असा सूर अळवण्यात आला आणि आज अखेर चार अधिकार्यांचे निलंबन करण्यात आले.
शिक्षण विभागातील तत्कालीन गटशिक्षणाधिकारी यांना ही जागा जिल्हा परिषद मालकीची आहे किंवा नाही हे माहीत असताना ही जाणीवपूर्वक इतर विभागातील अधिकार्यांना अंधारात ठेवल्याने त्यांच्यावर निलंबनाची वेळ आली, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. शिक्षण विभागाचा अनधिकृत जागेत शाळा वर्ग खोल्या बंधण्याचा संबंध नसेल तर प्रभारी गटशिकणाधिकारी यांनी बोधेगाव केंद्र शाळेच्या शेरे बुकमध्ये दि. 16 /4/21 रोजी नवीन वर्ग खोल्याचे बांधकाम लेंटल लेव्हल पर्यंत पूर्ण झाल्याचे कोणत्या आधारवर नमुद केले आहे. या शेरे बुक मधुन हे स्पष्ट होते की, शिक्षण विभाग देखील इतर विभागाप्रमाणे तितकाच जबाबदार असल्याची माजी सरपंच रामजी अंधारे यांनी म्हटले आहे.
Comments