सरपंच लवांडे यांच्या प्रयत्नांना यश । मुळा धरणावर आढावा बैठक संपन्न
करंजी । वीरभूमी - 24-Jan, 2022, 09:55 AM
वर्षानुवर्षे पाण्यासाठी वणवण फिरणार्या तिसगावकरांना आता लवकरच हक्काचे पाणी मिळणार आहे. तिसगावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार झाला असल्याची माहिती गावचे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे यांनी दिली.
मुळा धरण येथे झालेल्या बैठकीत राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी शेवटचा हात फिरवत या योजनेवर शिक्कामोर्तब केले असल्याचे लवांडे यांनी सांगीतले. या बैठकीस राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता श्री. गायकवाड साहेब, शाखा अभियंता निकम साहेब, तिसगावचे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे, पृथ्वीराज आठरे, संतोष आठरे, राजेंद्र म्हस्के, अण्णासाहेब भापसे, अंबादास कारखेले, बाबासाहेब कारखेले, भाऊ कोरडे आदी उपस्थित होते.
लवांडे म्हणाले की, गेल्या 40 वर्षांपासून पाण्यासाठी लढा देत आहे पण आता सर्व जुळुन आले आहे. राज्यमंत्री ना. तनपुरे यांच्या सहकार्याने पांढरीपुल ते तिसगाव अशी जमिनीवरून स्वतंत्र पाइपद्वारे तिसगावला पाणी मिळण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. ही पाईपलाईन पांढरीचा पूल, शिराळ, मांडवा मार्गे तिसगावला जाणार आहे. तिसगावच्या कार्यक्रमात सरपंच लवांडे यासह अनेक कार्यकर्त्यांनी पाणीप्रश्न उपस्थित केला होता. त्याअनुषंगाने आज मुळा धरणावर ना. तनपुरे यांनी बैठक आयोजीत केली होती.
या योजनेत कोणती गावे नव्याने समाविष्ट करण्यात येणार व कोणती गावे बाहेर पडणार याविषयी चर्चा झाली. पुढील 2040 पर्यंतचा लोकसंख्येचा अंदाज घेउन हा अराखडा तयार केला आहे. कौडगाव, त्रिभुवनवाडी व निंबोडी या गावाचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
या बैठकीत 39 गावांना अतिवृष्टीचे कोणतेच अनुदान मिळाले नाही. तसेच फुटलेले बंधारे, तलाव व बांध बंदिस्ती करण्याची मागणी लवांडे यांनी केली. यावेळी ना. तनपुरे यांनी अधिकार्यांना तात्काळ अनुदान देण्यासाठी सुचना केल्या.
MYHDfFAOy