ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार झाकण्यासाठी ऑनलाईन मिटिंग
टाकळी ढोकेश्वर । वीरभूमी- 28-Jan, 2022, 06:20 PM
पारनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या टाकळी ढोकेश्वरची ग्रामसभा पुन्हा एकदा वादात सापडली आहे. सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचा ऑनलाईन सभेला विरोध असताना ऑनलाईन पद्धतीने ग्रामसभा घेतली तसेच सभेमध्ये ग्रामस्थ विविध प्रश्न उपस्थित करीत असताना मनमानी करत सभा बंद केली.
त्यामुळे सदर ग्रामसभा स्थगित करून प्रत्यक्षात घेण्यात यावी, अशी मागणी माजी सरपंच व विद्यमान ग्रा.सदस्य शिवाजीराव खिलारी, बाजार समितीचे उपसभापती विलासराव झावरे, इंजी.नारायण झावरे, संजय झावरे, सदस्य किशोर गायकवाड, भाऊसाहेब खिलारी, बापुसाहेब रांधवन, दिपक साळवे, धोंडीभाऊ झावरे तसेच ग्रामस्थांनी केली आहे.
सदर ग्रामसभा ऑनलाइन ठेवण्यास ग्रामस्थांनी अगोदरच विरोध दर्शविला होता. परंतु सरपंच व ग्रामसेवक यांनी शासनाच्या आदेशानुसार तसेच गावात कोरोना रूग्णसंख्या जास्त असल्याने ग्रामसभा ऑनलाइन आयोजित केल्याचे सांगितले.
मात्र टाकळी ढोकेश्वर गावामध्ये चार दिवसांपूर्वी झालेल्या उद्घाटनप्रसंगी मोठी गर्दी असताना तसेच गावात नियमित सुरू असलेल्या बाजारात देखील मोठी गर्दी होत असताना कोरोनाविषयक कोणत्याही नियमांचे पालन केले जात नसल्याचे सभेमध्ये ग्रामस्थांनी सांगितले. केवळ ग्रामसभेसाठीच शासकीय नियम आहेत का? असा प्रश्न उपस्थित करून त्यांना निरूत्तर केले.
गावातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यासाठी प्रत्यक्ष ग्रामसभा होऊन सदर प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित असताना केवळ ऑनलाइन पद्धतीने सभा दाखवून जनतेचा रोष टाळण्याचा प्रयत्न सरपंच व ग्रामसेवक करीत असल्याचा तसेच विकासकामे करताना भेदभाव सुरू असून विरोधी सदस्यांच्या प्रभागात कामे करताना त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप विरोधकांनी केला.
तसेच जी काही कामे सुरू आहेत ती अतिशय संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना सुविधा मिळण्याऐवजी जास्त प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप माजी सरपंच शिवाजीराव खिलारी यांनी केला आहे.
दरम्यान ही ग्रामसभा पुन्हा आयोजित करण्यात यावी व जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी मागणी खिलारी यांनी केली आहे.
TcDCMNXqEBzotFIK