पारनेर । वीरभूमी- 06-Feb, 2022, 12:56 AM
पारनेर तालुक्यातील ढवळपुरी परिसरातील के. के. रेंजमध्ये लागवड केलेल्या झाडांमध्ये रात्री लागलेल्या वनव्यामुळे मोठ्या प्रमाणात आग पसरली होती. त्यावेळी ढवळपुरीतील अनेक तरुणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता या वणव्याला विझविण्याचे काम केले.
या बाबतची माहिती अशी की, ढवळपुरी गावाला लागून असलेल्या के. के. रेंज मध्ये जुना सुतारवाडी रोड लगत चिंचेच्या झाडाच्या परिसरातील शेकडो हेक्टरवर पाच ते सहा वर्षांपूर्वी हजारो रोपांची लागवड करण्यात आलेली आहे.
याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गवत उगवल्याने या दिवसात ते वाळलेले असते. काही समाजकंटक या वाळलेल्या गवतामध्ये आग लावून देण्याचे काम करीत असतात. त्यामुळे या गवताने पेट घेतल्याने त्याचे रूपांतर वनव्यात होते व त्यामुळे अनेक झाडे नष्ट होतात.
आज शनिवारी रात्री 7.30 च्या दरम्यान तेथे वणवा लागल्याने मोठ्या प्रकरणात वाळलेल्या गवताने पेट घेतल्याने आग वेगाने सगळीकडे पसरली. काही तरुणांनी हा लागलेला वणवा पाहिल्यानंतर गावांतील तरुणांना बोलावून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास 50-60 तरुणांनी दोन तास प्रयत्न केले. सुमारे 90 एकर क्षेत्रावरील आग आटोक्यात आणण्यासाठी जीवाचा विचार न करता तरुणाई धडपडत होती.
यामध्ये सचिन थोरात, किरण बुचुडे, पियुष कुंभकर्ण, मोसीन पटेल, प्रदिप साळवे, सार्थक खोदडे, संदीप बुचुडे, विशाल वाव्हळ, प्रतिक नेटके, रमेश गीते, ज्ञानेश्वर कुटे, हबीब शेख, सचिन थोरात, रमेश केदारी, वैभव खांडके, अमोल कुंभकर्ण, प्रितम नेटके, प्रशांत कुंभकर्ण, यश मोरे, गणेश दळवी अशा जवळपास 50-60 तरुण उपस्थित होते.
के. के. रेंज मधील शेकडो झाडे अवैधपणे तोडली जात आहेत. के. के. रेंजच्या परिसरामध्ये निलगिरी, लिंब आदी हजारो झाडांची लागवड केलेली आहे. अशी मोठी झालेली शेकडो झाडे रात्रीच्या वेळी आधुनिक मशीनच्या साहाय्याने तोडली जात आहेत.
ही झाडे बेकायदेशीरपणे तोडून त्याची विक्री केली जात आहे. शेकडो एकरवर लावलेली झाडे तोडल्यामुळे हा परिसर उजाड झाला आहे. तसेच तेथील वन्यजीवांचेही इतर ठिकाणी स्थलांतर झाले आहे. तेव्हा लष्करी अधिकार्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशीही तरुणांनी मागणी केली आहे.
ZhoteSBYFI