शेवगाव । वीरभूमी - 06-Feb, 2022, 01:14 AM
अतिवृष्टीने रस्त्यांची दुरावस्था झाली असताना आघाडी शासन जिल्हा व राज्यमार्गाला निधी देत नाही.एखादा जीव गेला तरच हे शासन निधी देणार आहे का? असा सवाल आमदार मोनिका राजळे यांनी केला असुन अडीच वर्षापासुन राज्याचा सर्व विकास थांबला की काय? असा प्रश्न पडल्याचा आरोप राजळे यांनी केला.
शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथे आमदार स्थानिक निधीतुन 15 लक्ष खर्चाचे हनुमान मंदिरासमोर सभामंडप व जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत अतिवृष्टी पुरहानी मधून शहरटाकळी येथील 25 लक्ष खर्चाच्या मनवेलकर वस्ती ते पवार वस्ती रस्ता मजबुतीकरण कामाचे भुमिपुजन आ. राजळे व मंहत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते झाले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, तालुकाध्यक्ष ताराभाऊ लोढे, बापुसाहेब पाटेकर, अध्यक्षा आशा गरड, शहराध्यक्षा उषा कंगनकर, अर्बन बँकेचे संचालक कमलेश गांधी, रोहिणी फलके, डॉ. अरविंद पोटफोडे, संदीप वाणी, संतोष चोरडिया, वाय. डी. कोल्हे, संदीप खरड, सुभाष बरबडे, सोपान वडने, संभाजी फटांगरे, गंगाभाऊ खेडकर, मुसाभाई शेख, बशीर पठाण आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार राजळे म्हणाल्या की, आघाडी शासनाच्या काळात शेतकर्यांच्या चेहर्यावर हसु येत नाही. या सरकारने निवडणुकीपुर्वी केलेल्या घोषणा पुर्ण केल्या नाहीत. कर्जमाफीची रक्कम, नुकसान भरपाई अद्याप शेतकर्यांना मिळाली नाही. युती शासनाने जलयुक्त शिवारातुन गावोगाव पाणी दिले. मात्र विजेचा खेळ करुन आघाडी सरकार हे पाणी देऊ शकत नाही.
उभ्या पिकाचे नुकसान होत असल्याने सक्तीच्या वसुलीने शेतकर्यांनी 5 हजार रुपये विज बिल भरले परंतु वेळेवर वीज मिळत नाही कि रोहित्र बदलून मिळत नाही. असे सांगुन आ. राजळे म्हणाल्या की आता होणार्या निवडणुका पाहता सर्वांनाच जनतेची काळजी पडली आहे.
भाजपाने कोरोना काळात संपूर्ण राज्यात मदत केली. या शासनापासुन सर्व पातळीवर नुकसान होत आहे. याची जाणीव येणार्या निवडणुकीत करावी लागणार आहे. आपण नात्यागोत्याचे राजकारण न करता निष्ठेने पक्षहितासाठी काम करीत आहोत. जिल्ह्यात भाजपाची ताकद कशी वाढेल यासाठी होणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकीत भाजपाच्या सत्तेसाठी काम करणार आहे.
वृध्देश्वर कारखाना दुष्काळी भागातील असताना सर्वात जास्त भाव देत आहे. शेतकर्यांची नुकसान होणार नाही याची हा कारखाना दखल घेतो. ऊसतोडीसाठी पैशाची मागणी झाल्यास कारखान्याकडे तक्रार करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अरुण मुंढे यांनी आपल्या भाषणात नियोजन समितीवर दोन राजकीय पुत्रांची वर्णी लागली बाकी कुणी लायकीचे नाही का? आघाडी शासन नात्यागोत्याचे राजकारण करीत ठरावीक घरात सत्ता प्रस्थापीत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.
Comments