विधवा महिलेला मदत व सत्कार करुन शुभमंगल सावधान
पिंगळे परिवाराचा अनोखा आदर्श
अकोले । वीरभूमी - 06-Feb, 2022, 10:44 PM
आपल्या पुतणीच्या लग्नसमारंभात लग्न लावण्याअगोदर कोरोनात विधवा झालेल्या भगिनीला सर्वांच्या साक्षीने मंडपात रोजगारासाठी आर्थिक मदत दिली. तर दुसर्या एका विधवा महिलेने संसाराची नवी सुरुवात केली म्हणून तिचा सत्कार केला आणि मगच ’शुभमंगल सावधान’ सुरु झाले. लग्नात आनंदाच्या प्रसंगी विधवा भगिनींच्या सन्मानाचा आदर्श भरतशेठ पिंगळे व त्यांच्या परिवाराने घालून दिला.अकोले येथील व्यापारी भरत पिंगळे यांची पुतणी व कैलास किसन पिंगळे यांची सुकन्या सपना हिच्या लग्न समारंभानिमित्त त्यांनी पत्रकार तथा प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांच्याकडे ही कल्पना मांडली.श्री. सातपुते सर यांनी शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्या मदतीने अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील कोरोनाच्या आजाराने पतीच्या निधनामुळे विधवा झालेल्या भगिनीची त्यासाठी निवड केली.
आशाताई कानिफ परते या कोहोंडीच्या महिलेची निवड केली. त्यांचे पती मजुरी करत होते. त्यांना चार मुले आहेत व साधे रेशनकार्डही त्यांच्याकडे नाही. या महिलेला स्वतःच्या पायावर उभे करण्याच्यादृष्टीने एक शेळी किंवा शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी रुपये आठ हजाराचा चेक या लग्न-समारंभात ज्येष्ठ नेते, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मधुकरराव नवले व ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे यांच्या हस्ते देण्यात आला.
तसेच यावेळी नुकतेच ढोकरी येथे कोरोनात विधवा झालेली महिला पूनम शेटे व तिचा दीर समाधान शेटे यांनी विवाह करून समाजामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला. त्याबद्दल त्यांचा शाल, साडी व लहान मुलीला कपडे देऊन सत्कार केला व ते लग्न जमवणारे राजकीय व सामाजिक कार्यकर्ते माधवराव तिटमे यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी मधुकरराव नवले म्हणाले की, आपल्या आनंदाच्या क्षणात अशा दुःखी माणसांची आठवण ठेवण्यात भरत पिंगळे यांची सामाजिक भावना नक्कीच कौतुकास्पद आहे; समाजातल्या उपेक्षित भगिनींची आठवण ठेवणे महत्त्वाचे आहे.
यावेळी अशोकराव भांगरे म्हणाले की, अशा निराधार गरीब कुटुंबांना लग्नाच्या प्रसंगी मदत करण्याचा आदर्श यशस्वी उद्योजक भारत पिंगळे यांनी आज समाजाला घालून दिला आहे. तालुक्यात इथून पुढे होणार्या सर्व लग्नात वधू-वराच्या पालकांनी अशी भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले व या दोन्ही सत्कारामागची भावना व प्रास्ताविक हेरंब कुलकर्णी यांनी सविस्तर स्पष्ट केली.
लग्न लागण्यापूर्वी मांडवात या दोन संस्कारांनी वातावरण भावनिक झाले व अकोले तालुक्यात इथून पुढे अनेक लग्नांमध्ये अशी परंपरा सुरू होईल, असे अनेकांनी बोलून दाखवले.
भारतशेठ पिंगळे यांनी आपण गरिबीतून शिक्षण घेतल्यामुळे आपल्यासारख्या अशा प्रकारच्या कुटुंबानं विषयी माझ्या मनात सदैव प्रेम असते. यानिमित्ताने ते व्यक्त करायची संधी मिळाली. याचे समाधान वाटते असे सांगितले.
यावेळी डॉ. साहेबराव वैद्य, सौ. छायाताई वैद्य, रमेशराव जगताप, यशवंतराव आभाळे, जालिंदर वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे, संदीपराव शेटे, बाळासाहेब वडजे, नितीन नाईकवाडी, रामहारी तिकांडे, माधवराव तिटमे, मुख्याध्यापक सुभाष चासकर, शांताराम वैद्य, लक्ष्मण वैद्य, एकनाथ शेटे, भारत पिंगळे, कैलास पिंगळे, सुभाष धुमाळ इत्यादी उपस्थित होते.
pFgDxNzUTHV