बुधवारी होणार निवड । उषा राऊत होणार नगराध्यक्ष
कर्जत । वीरभूमी - 09-Feb, 2022, 02:41 PM
कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखलच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उषा मेहेत्रे-राऊत यांनी अर्ज दाखल केला आहे. कर्जत पालिकेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे बहुमत असल्याने नगराध्यक्ष म्हणुन उषा राऊत यांची वर्णी लागणार आहे. मात्र ही निवड 16 फेब्रुवारी रोजी होणार असल्याने अधिकृत घोषणाही याचवेळी होणार आहे.
कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाला 15 तर भाजपाला 2 जागा मिळाल्या आहेत. नगरपंचायतीत राष्ट्रवादी-काँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे. यामुळे आ. रोहित पवार हे नगराध्यक्ष पदासाठी कोणाची निवड करतात, याकडे लक्ष लागले होते. मात्र आज नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी उषा राऊत-मेहेत्रे यांनी अर्ज दाखल केला आहे.
उषा राऊत यांनी दाखल अर्जावर सुचक म्हणून छाया सुनील शेलार यांची तर अनुमोदक म्हणून ताराबाई सुरेश कुलथे यांची स्वाक्षरी आहे. मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्याकडे अर्ज दाखल करतेवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
आ. रोहित पवार यांनी भाजपाच्या राम शिंदेकडून कर्जत नगरपंचायत ताब्यात घेतली. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने 15 जागेवर विजय मिळवत भाजपाचा दारुण पराभव केला होता. भाजपाला अवघ्या दोनच जागेवर समाधान मानावे लागले.
नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण निघाल्यानंतर नगराध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागते याकडे कर्जतकरांचे लक्ष लागले होते. मात्र उमेदवारी अर्ज दाखल नंतर नगराध्यक्षपदी उषा राऊत यांची निवड निश्चित मानली जात आहे. या निवडीची 16 फेब्रुवारी रोजी अधिकृत घोषणा बाकी आहे.
कर्जत नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्ष म्हणून भाजपाकडून नामदेव राऊत विराजमान झाले होते. त्यानंतर अडीच वर्षानंतर पुन्हा नामदेव राऊत यांची उपनगराध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यानंतर आता त्यांच्या स्नुषा असणार्या उषा राऊत यांचा राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षापदी अर्ज प्राप्त झाल्याने राऊत यांच्या नावाची पाटी कर्जत नगरपंचायतीत कायम राहणार आहे.
qcekGnNiTVdDf