वृद्धाचा मृत्यू । नगर-दौंड रस्ता बनला मृत्यूचा सापळा
श्रीगोंदा । वीरभूमी - 09-Feb, 2022, 09:23 PM
श्रीगोंदा तालुक्यातून जाणार्या अहमदनगर-दौंड महामार्गावरील काष्टी येथून सांगवी दुमालाकडे पायी जाणार्या वृद्धाला भरधाव कारने जोराची धडक दिली. या धडकेमध्ये वृद्ध भगवान बाबू थोरात (वय 60 वर्षे, रा. सांगवी दुमाला) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवार दि. 9 रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला.
याबाबत विजय परसराम रणपिसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अज्ञात पांढर्या कार चालकांविरोधात बेदरकारपणे गाडी चालवून वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलिस हवालदार फलके करत आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून मनमाड-बेळगाव (राष्ट्रीय महामार्ग एन.एच. 160) या रस्त्याचे काँक्रीटीकरण काम चालू असून 15 मीटर रुंदीच्या या रस्त्याला दुभाजक नाही. रिफ्लेक्टर व गतिरोधक असूनही कमकुवतपणामुळे ते प्रभावी ठरत नाहीत.
रस्त्याचे नविनीकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंत 450 च्या पुढे निरपराध नागरिकांचा बळी गेला आहे. तर शेकडो नागरिक जायबंदी झाले आहेत. रस्ता झाल्यापासून विकास तर कोसो दूर राहिला आहे.
पण ठेकेदाराच्या अक्षम्य चुकीमुळे अनेक निरपराध नागरिकांचा बळी व असंख्य बालकांचे पालकत्व हरपले आहे. या सर्व गोष्टीला ठेकेदार व रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
Comments