संगमनेर । वीरभूमी- 27-Feb, 2022, 05:27 PM
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण व वेणूताई चव्हाण यांच्या नावाने असणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय यशवंत- वेणू पुरस्कार हा जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक आमदार डॉ. सुधीर तांबे व नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे यांना जाहीर झाला असून येत्या रविवारी 6 मार्च 22 रोजी पुणे येथे शानदार कार्यक्रमात त्यांना प्रदान केला जाणार आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड, पुणे यांच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार राज्यातील विविध मान्यवरांना दिला जातो. या वर्षी या पुरस्कारासाठी आमदार डॉ. सुधीर तांबे व सौ दुर्गाताई तांबे यांची निवड झाली असून पुणे येथील एस. एम. जोशी सभागृह, पत्रकार भवन शेजारी रविवार दिनांक 6 मार्च 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदामराव मोरे यांच्या उपस्थितीमध्ये आमदार डॉ. तांबे व सौ. दुर्गाताई तांबे यांना गौरविण्यात येणार आहे.
आमदार डॉ. सुधीर तांबे गेली 22 वर्षापासून जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून निरोगी समाज निर्मितीचे काम करत असून संगमनेर मध्ये ते पहिले एमएस सर्जन आहेत. अत्यंत सेवाभावी पद्धतीने त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात सेवा देताना संगमनेरचे नगराध्यक्ष म्हणून केलेले काम पुढील पिढ्यांसाठी उल्लेखनीय ठरले आहे. पुरोगामी विचारांचे पाईक असणारे आमदार डॉ तांबे हे शैक्षणिक, क्रीडा, समाजकारण, सहकार, कृषी ,सहकार या क्षेत्रात काम करत असून अपंग व मूकबधिरांसाठी संग्राम संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम उभे केले आहे.
महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली 2009 पासून अहमदनगर, नाशिक, धुळे ,जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांचे ते प्रतिनिधित्व करत असून विधान परिषदेमध्ये सातत्याने विविध प्रश्नांवर आवाज उठवला आहे. पाच जिल्ह्यातील 54 तालुक्यात त्यांचा दांडगा संपर्क असून प्रत्येक कार्यकर्त्याला नावानिशी ओळखण्याची पद्धत यामुळे ते पाचही जिल्ह्यातील लोकप्रिय आहे.
सौ.दुर्गाताई तांबे यांनी जयहिंद महिला मंचच्या माध्यमातून तालुक्यात बचत गटांची मोठे संघटन केले असून लोकाग्रहास्तव पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांनी मिळविला आहे.
स्वच्छ संगमनेर, सुंदर व हरित संगमनेर ही संकल्पना त्यांनी राबवली असून त्यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगरपरिषदेला राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
या दाम्पंत्याचा येत्या रविवारी पुण्यामध्ये शानदार कार्यक्रमात व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गौरव होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी राज्यातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन यशवंत वेणू प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments