महाशिवरात्री निमित्त हजारो भाविकांनी घेतले अगस्ति ऋषींचे दर्शन
अगस्ती आश्रमात महाशिवरात्री उत्सव
अकोले । वीरभूमी- 01-Mar, 2022, 10:41 PM
अकोले तालुक्याचे आराध्य दैवत अगस्ती आश्रमात महाशिवरात्रीच्या महापर्वा निमित्ताने अबाल वृद्धांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत हजारो भाविकांनी अगस्ति ऋषींचे दर्शनाचा लाभ घेतला.महाशिवरात्री निमित्ताने अगस्ती आश्रमात दरवर्षी मोठी यात्रा भरत असते. मात्र मागील दोन वर्षांपासून करोनाच्या संकटामुळे यात्रा भरली नव्हती. या वर्षी यात्रोत्सव ऐवजी महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.हा उत्सव दोन दिवस सुरू राहणार आहे.पहाटे साडे तीन वाजता आमदार डॉ. किरण लहामटे व नगरविकास विभागाचे उपसचिव विजयराव चौधरी यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली. मोरेश्वर धर्माधिकारी यांनी महापूजेचे पौराहित्य केले. अगस्ति देवस्थानचे अध्यक्ष अॅड. के. डी. धुमाळ यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प. पू. योगी केशव बाबा, देवस्थानचे सचिव सुधाकर शाळीग्राम, खजिनदार किसनराव लहामगे, विश्वस्त गुलाबराव शेवाळे, परबतराव नाईकवाडी, संतुजी भरीतकर, हभप. दीपक महाराज देशमुख, भानुदास तिकांडे, रमेश नवले, नवनाथ गायकवाड, मधुकर वाकचौरे, अनिल गायकवाड, व्यवस्थापक रामनाथ मुर्तडक आदिसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महापुजे नंतर मंदिर पहाटे 4 वाजेपासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.पहाटे पासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारी उन्हामुळे गर्दी मंदावली. सायंकाळ नंतर पुन्हा गर्दी वाढली. अबाल वृद्धांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. रात्री उशीरा पर्यंत भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होती.
अगस्ति आश्रम परिसर गजबजून गेला होता. परिसरातील सर्व मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. स्वयंसेवी संस्था तसेच खासगी व्यक्तीं तर्फे शुद्ध पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी लहान मोठ्या सुमारे 400 च्या वर वेगवेगळे दुकाने लावली होती. दुकानदारांची देवस्थान तर्फे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. यात्रे निमित्त अगस्ति देवस्थान परिसरात मोठमोठे पाळणे, खेळणी यांचा आनंद लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत सर्वांनी लुटला.
अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांनी रांगेत अगस्ति ऋषींचे दर्शन घेतले. महिलांसाठी वेगळी व पुरुषासाठी वेगळी रांग करण्यात आली होती. भाविकांनी मंदिर विकासासाठी मोठ्या प्रमाणात देणगी देऊन आपले सामाजिक, आध्यत्मिक कार्यात सहभाग नोंदविला. तरुणाई भोंगे वाजवीत यात्रेचा आनंद लुटताना दिसत होती. मंदिर परिसरात छोटी मोठी खेळणीची, थंड पेयांची, प्रसादाची, महिला वर्गासाठी जनरल स्टोअर्सची दुकाने लागली होती.
अगस्ति देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. के. डी. धुमाळ, सर्व विश्वस्त, व्यवस्थापन यांनी यात्रेचे अतिशय सुंदर नियोजन केलेले आहे. देवस्थान ट्रस्टच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी वारकरी, भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहे.
माजी नगरसेवक प्रमोद मंडलिक, प्रा. गणपत नवले, मनोहर नवले, गोविंद वाळुंज हे भाविक भक्तांचे स्वागत करून दान धर्म करण्यासाठी भाविकांना आवाहन करीत होते. तालुक्यासह नगर, नाशिक, पुणे, मुंबई येथील भाविकांनी हजेरी लावून दर्शन घेतले. तालुक्यातील विविध संस्थाचे पदाधिकारी, मान्यवरांचे देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आले.
अकोलेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन व होमगार्ड, ग्रामीण भागातील तरुणांनी यात्रेमध्ये गोंधळ होणार नाही. सर्वांना व्यवस्थित दर्शन घेता येईल यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मंदिरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरच वाहने अडविण्यात आल्याने येणार्या भाविकांना कोणताही त्रास झाला नाही. प्रभाग क्र. 14 मध्ये भाविकांना नगरसेवक शरद नवले यांनी साबुदाणा खिचडी व राजगिरा लाडूचे वाटप केले.
माजी मंत्री मधुकरराव पिचड, जि. प. चे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे, जि. प. सदस्य सुनिता भांगरे, यांनी रतनवाडी येथे अमृतेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
अकोले तालुक्यातील हरिचंद्र गडावर महादेव मंदिर, लिंगदेव येथे लिंगेश्वर महादेव मंदिर, सोमठाणे येथे सोमेश्वर मंदिर, केळी रुम्हणवाडी येथे केळेश्वर मंदिर, धुमाळवाडी येथे सिद्धेश्वर मंदिर, अकोले येथील सिद्धेश्वर मंदिर, कळसेश्वर मंदिर, उंचखडक येथील खडकेश्वर मंदिर येथे भाविकभक्तांनी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
Tags :
XRwbWpzhKLkrOuIU