ज्येष्ठ पत्रकार डी. के. वैद्य यांचे निधन
अकोले । वीरभूमी- 14-Mar, 2022, 10:48 PM
अकोले तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार, सेवानिवृत्त प्राध्यापक डी. के. वैद्य (वय 71 वर्ष) यांचे आज सोमवारी सायंकाळी अल्प आजाराने निधन झाले.
त्यांचे पश्चात पत्नी सेवानिवृत्त प्राचार्या श्रीमती पद्मा, तीन मुली स्नेहल भाटे, आकांक्षा वैद्य, प्राची उगले, एक मुलगा इंजि. सौरभ, सून राजश्री, जावई, नातवंडे, तीन बहिणी, भाऊ असा परिवार आहे.
त्यांचे पार्थिवावर उद्या मंगळवारी सकाळी 9 वाजता अकोले येथे प्रवरा तीरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वैद्य यांनी प्रतिकूल स्थितीत आपले एमए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मराठी, इंग्रजी, संस्कृत या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.
हिंद सेवा मंडळाच्या अकोले येथील मॉडर्न हायस्कुल मध्ये शिक्षक म्हणून त्यांनी सेवेस प्रारंभ केला. नंतर त्याच विद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयात ते प्राध्यापक झाले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून तेथेच ते सेवानिवृत्त झाले.
गत 30 वर्षे पत्रकार म्हणून ते कार्यरत होते. सकाळ, प्रभात या दैनिकांसाठी पत्रकार म्हणुन त्यांनी काम केले. एक व्यासंगी पत्रकार अशी त्यांची ओळख होती. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी विविध विषयांवर विपुल लेखन केले. त्यांची वार्तापत्रे वैशिष्ठ पूर्ण असत. अलीकडेच त्यांनी आठवणींचा उमाळाया आत्मचरित्रपर लेख मालिकेचे लिखाण सुरू केले होते. ही लेख मालिका चांगलीच वाचनीय ठरली होती पण आजार पणामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना या लेख मालिकेचे लिखाण बंद करावे लागले. ते प्रभावी वक्तेही होते.
त्यांच्या निधनाने तालुका एका अभ्यासू पत्रकार तसेच जेष्ठ शिक्षकाला मुकला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अकोले येथील त्यांच्या निवासस्थानी माजी आमदार वैभव पिचड यांनी भेट देऊन दुःख व्यक्त केले. तर माजी मंत्री मधुकर पिचड यांनी सामाजिक प्रश्नांची उकल करून वंचित उपेक्षितांना न्याय देणारे व्यक्तिमत्त्व हरपले अशी प्रतिक्रिया दिली.
ZOnHLwJz