बोधेगाव । वीरभूमी- 14-Mar, 2022, 11:03 PM
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील मारुती मंदिरा शेजारी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत विविध विषयावर ग्रामस्थ, सत्ताधारी आणि विरोधकामध्ये अडीच तास वादळी चर्चा घडून आली.
ग्रामसभेचे अध्यक्ष माजी सरपंच म्हसु घोरतळे हे होते. यावेळी उपसरपंच नितीन काकडे, माजी सरपंच रामजी अंधारे, विष्णू वारकड, कुंडलिकराव घोरतळे, राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष माजी जि. प. सदस्य प्रकाश बापु भोसले, ग्रा. पं. सदस्य फिरोजभाई पठाण, सदानंद गायकवाड, प्रकश गर्जे, सुनील खंडागळे, भगवान मिसाळ, संतोष बानाईत, के. टी. टेलर सह ग्रामस्थ उपस्थित होते.
बोधेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभेत विविध विषय मांडण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने बोधेश्वर मंदिर शुशोभिकरणांमधील काम, जिल्हा परिषद शाळा वर्ग खोल्याचा निधी मागे जाऊ नये, जनावरांच्या दवाखान्याला जागा, या संदर्भात दोन तास सत्ताधारी, विरोधक आणि ग्रामस्थांमध्ये वादळी चर्चा पहायला मिळाली.
या विषयाबरोबरच सौरऊर्जा प्रकल्पाकरीता ग्रामपंचायतीने हरकत घेतल्याने, तलाठी कार्यालयाचा प्रश्न, देशी दारु दुकान गावाबाहेर हलविणे, गोडाउनच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र व्यवहार, पाणंद रस्ते तसेच अतिक्रमण काढण्याबरोबर इतर विषया संदर्भात मोठी चर्चा घडुन आली.
मुलांच्या शिक्षणात राजकारण आणू नये. सदरील विषय सामोपचाराने सोडवावेत. गावाच्या नावाला लांच्छन लागु नये यासाठी एकत्र बसून प्रयत्न करण्याचे आवाहन काही ग्रामस्थांच्या वतीने सत्ताधारी व विरोधकांना करण्यात आले.
ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी जाधवर यांनी दोन्ही पार्टीने शालेय विषयात राजकारण आणु नये असे बोलताच विरोधी गटातील संजय बनसोडे यांनी उत्तर देत त्यांना सांगितले की, जर राजकारण आम्ही करत आहोत तर शाळा वर्ग खोल्या प्रकरणात ग्रामसेवकासह अधिकारी का निलंबित झाले, याचे उत्तर द्यावे. असे म्हणताच ग्रामसेवक पुन्हा शांत झाले. अशा प्रकारच्या प्रश्नोत्तराने ग्रामसभा चांगलीच गाजली.
Comments