ताजनापुर योजनेबाबत आ. मोनिका राजळे यांची विधानसभेत लक्षवेधी
शेवगाव । वीरभूमी - 15-Mar, 2022, 04:30 PM
शेवगाव तालुक्यातील पूर्व भागाला वरदान ठरणाऱ्या ताजनापुर टप्पा क्रमांक दोन चे काम करणाऱ्या एजन्सीने वेळेत काम सुरू न केल्याने सदर एजन्सीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे तसेच या योजनेच्या पूर्णत्वासाठी सरकार कडून काही उपाय योजना करता येतील का? असा प्रश्न आमदार मोनिका राजळे यांनी विधीमंडळात प्रश्न उत्तराच्या तासाला उपस्थित केला आहे.
यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
शेवगाव तालुक्यातील पूर्व भागाला वरदान ठरणाऱ्या ताजनापुर उपसा जलसिंचन योजना क्रमांक दोनचे काम रेंगाळले आहे. हे काम तातडीने पूर्ण जाण्याबाबत आमदार मोनिका राजळे यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या प्रश्नोत्तराच्या तासाला ताजनापुर टप्पा क्रमांक 2 बाबत प्रश्न उपस्थित करत योजना पूर्ण करण्याबाबत मागणी केली.
याबाबत आमदार राजळे म्हणाल्या, ताजनापुर जलसिंचन उपसा क्रमांक 1 पूर्ण झाले असून क्रमांक दोन ही योजनाही बंद पाइपद्वारे शेतीला पाणीपुरवठा करणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. गेली पंचवीस-तीस वर्षापासून हा प्रकल्प रेंगाळलेला आहे. हे काम घेणाऱ्या कलकत्ता येथील एजन्सीला माहिती विचारली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. यामुळे वेळेत काम न करणाऱ्या एजन्सीला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकावे तसेच सरकारकडून काही उपाय योजना पूर्णत्वास येण्यासाठी प्रयत्न होतील का? असा प्रश्न आ. राजळे यांनी उपस्थित केला.
या प्रश्नावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिले. आमदार पाटील म्हणाले, ताजनापुर जलसिंचन योजनेबाबत सध्या माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. मात्र आज सायंकाळपर्यंत सदरील योजनेची माहिती घेऊन काम न करणाऱ्या कंपनीला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकले जाईल. तसेच योजना पूर्णत्वास करण्याबाबत उपाय योजना करण्यास येतील, असे आश्वासन ना. पाटील यांनी दिले.
अनेक वर्षापासून रेंगाळलेल्या ताजनापुर योजनेबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित करून योजना पूर्णत्वास नेण्याबाबत आमदार राजळे यांनी आवाज उठविल्याने लाभधारक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
WylQtpwxYa