अगोदर ऊस पेटवला नंतर विषारी औषध घेऊन शेतकर्याची आत्महत्या
शेवगाव । वीरभूमी - 07-Apr, 2022, 12:39 AM
मोठ्या कष्टाने व मेहनतीने शेतात लावलेल्या ऊसाचे पिक जोमात आले होते. मात्र त्या ऊसाला कारखान्याकडून तोड मिळत नसल्याने शेतकर्याने ऊस पेटवून देऊन विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना शेवगाव तालुक्यातील जोहरापूर येथे घडली आहे.
जनार्दन सीताराम माने (वय 70) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे. याबाबत शेवगाव पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलिस अधिक चौकशी करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, शेवगाव तालुक्यातील जोहरापूर येथील शेतकरी जनार्दन सीताराम माने (वय 70) यांनी मोठ्या कष्टाने तीन एकर क्षेत्रावर ऊस लागवड केली होती. त्या ऊसाची तोडणीची तारीख टळून गेली होती. सध्या अतिरीक्त ऊसाचे उत्पादन झाल्याने तोडणी मिळणे दुरापास्त झाले होते.
त्यातच मंगळवारी दुपारी जनार्दन माने यांनी स्वतःच्या हाताने शेतातील उभ्या ऊसाच्या पिकाला आग लावून दिली. त्यानंतर त्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी औषध घेतल्यानंतर बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शेवगाव पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू रजिस्टर नोंद करण्यात आली असून पोलिस चौकशी करण्यात येत आहे.
यावर्षी ऊसाचे अतिरिक्त उत्पादन झाल्याने अनेक शेतकर्यांच्या ऊसाला तोड मिळत नाही. त्यातच जनार्दन माने या शेतकर्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
Comments