मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांची मागणी । जोहरापूर येथील शेतकरी आत्महत्या प्रकरण
शेवगाव । वीरभूमी - 12-Apr, 2022, 11:35 PM
उसाला वेळीच तोड मिळाली नाही म्हणून शेवगाव तालुक्यातील जोहरापूर येथील शेतकरी कै.जनार्दन माने यांनी शेतातील उभा ऊस पेटवून देत विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी सर्वस्वी कारखाना प्रशासन कारणीभूत असून याप्रकरणी तातडीने कारखाना प्रशासना विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व कारखान्याच्या वतीने पिडीत कुंटुबियांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी केली आहे.
आज जोहरापूर येथील आत्महत्या केलेल्या शेतकरी कै.जनार्दन माने यांच्या निवास्थानी जाऊन मनसेच्या प्रमुख पदाधिकार्यांनी भेट देत परिस्थितीची माहीती घेतली. तालुक्यातील अनेक साखर कारखाने कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणून स्थानिक शेतकर्यांवर अन्यान्य करत आहेत. स्थानिक शेतकर्यांना उस तोडीसाठी टोळ्या दिल्या जात नाहीत.
हा अन्याय राजरोसपणे सुरू असून या विंवचनेतूनच माने यांनी आत्महत्येचा पर्याय निवडला. यास सर्वस्वी कारखाना प्रशासन जबाबदार असून कारखाना प्रशासना विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला पाहीजे, अशी मागणी यावेळी मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी केली आहे.
येत्या तीन-चार दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ साखर आयुक्तांची भेट घेऊन सदर कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी करणार असल्याचे उपजिल्हा अध्यक्ष गोकुळ भागवत यांनी सांगितले.
यावेळी मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे, उपजिल्हाध्यक्ष गोकुळ भागवत, उपतालुकाध्यक्ष संजय वणवे, सोमनाथ आधाट, विकास भागवत, गणेश डोमकावळे, नवनाथ भागवत, रामेश्वर बलिया, ज्ञानेश्वर कुसळकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब फंटागरे आदी जण उपस्थित होते.
nOtrPRcfayi