अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेचा गोल्ड व्हॅल्युअरसह 159 कर्जदारांचा आरोपीत समावेश
अहमदनगर । वीरभूमी - 29-Apr, 2022, 09:45 AM
अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील बनावट सोने तारणप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी गोल्ड व्हॅल्युअर विशाल गणेश दहिवाळकर (रा. शेवगाव) याच्याविरूध्द आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शेवगाव न्यायालयात 250 पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे.
कर्जदारांकडून बनावट सोने घेऊन ते खरे असल्याचे भासवत त्यांना मूल्यांकन दाखले देऊन बँकेची फसवणूक केल्याचा दोष आरोपी दहिवाळकर याच्यावर ठेवण्यात आला आहे.
शेवगाव शाखेतील बनावट सोने तारणप्रकणी गोल्ड व्हॅल्युअर दहिवाळकरसह 159 कर्जदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत शेवगाव शाखेचे व्यवस्थापक अनिल वासुमल आहुजा यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सन 2017 ते 2021 या कालावधीत गोल्ड व्हॅल्युअर दहिवाळकर व कर्जदारांनी संगनमत करून बनावट दागिने खरे असल्याचे भासवून मूल्यांकन दाखले देऊन बँकेकडून कर्ज घेतले. कर्जदारांना वेळोवेळी नोटिसा देऊनही त्यांनी तारण ठेवलेले सोने सोडून घेतले नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी नगर येथे बँकेच्या मुख्य शाखेत या सोन्याचा लिलाव ठेवण्यात आला होता. मात्र, त्यातील सोने बनावट असल्याचे समोर आले होते.
मागील चार वर्षांच्या कालावधीत 159 कर्जदारांनी 364 पिशव्यांत 27 किलो 351 ग्रॅम सोने बँकेकडे तारण ठेवून सुमारे 5 कोटी 30 लाख 13 हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यामुळे बँकेचे गोल्ड व्हॅल्युअर दहिवाळकर याच्यासह 159 कर्जदारांवर बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपी दहिवाळकर याला अटक केली होती. त्याच्याविषयी पुरावे गोळा करून 250 पानांचे दोषारोपपत्र तयार करण्यात आले.
Comments