अहमदनगर - सोलापूर महामार्गावरील कोकणगाव जवळ घडला अपघात
मिरजगाव । वीरभूमी- 29-Apr, 2022, 01:27 PM
अहमदनगर - सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील कोकणगाव येथील बोरुडे वस्ती जवळ मालट्रक व तीन चाकी अॅपे रिक्षा, क्रुझर गाडी, दुचाकी वाहन या चार वाहनांचा भीषण अपघात घडला आहे.
या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून दहा जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमींना नगर येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहेत. हा अपघात दि.28 रोजी रात्री 9.30 वाजेच्या दरम्यान घडला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अहमदनगरहून सोलापूरच्या दिशेने येणार्या मालट्रक क्रमांक टी.एन.88 एक्स 9293 हा महामार्गावरील कोकणगाव जवळ आला असता, या भरधाव वेगाने आलेल्या मालट्रकने मिरजगावहून नगरच्या दिशेने जाणार्या क्रुझर गाडी क्रमांक एम.एच. 09 डीएन 9859 व तीन चाकी अॅपे रिक्षा क्रमांक एम.एच. 14, डी. एम 4557 या वाहनांसह जी.डी.डिलक्स कंपनी या दुचाकी वाहनास जोराची धडक दिली.
मालट्रकच्या धडकेने हे तिन्ही वाहने काही मीटर अंतरावर फरफटत नेली. अपघातामध्ये दुचाकीवरील कृष्णा मल्हारी बोरूडे (वय 24) रा.कोकणगाव ता.कर्जत तसेच क्रुझर गाडीमधील सोपान दिनकर काळे हे दोघेजण जागीच ठार झाले आहेत.
तर दुचाकीवरील भाऊ आत्माराम कर्पे (वय 26) व क्रुझर गाडीमधील कोमल काळे (वय 20), लता काळे (वय 35) यांच्यासह दहा जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमींना नगर येथे रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. (इतर जखमींची नावे समजलेली नाही) जखमींमध्ये लहान मुलांचा ही समावेश असल्याचे समजते.
अपघात घडला असता, मालट्रक ड्रायव्हर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. सदर अपघाताची माहिती मिळताच कोकणगाव येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली.
रुग्णवाहिकेमधून अपघातग्रस्तांना उपचारार्थ रुग्णालयात हलविले. तसेच महामार्ग पोलिस पोसई. संजय टेमगिरे, ए. एस. आय कुलांगे, पो.हे.कॉ. शेंडे, पो.कॉ. कदम, मिरजगावचे पोलिस कर्मचारी हंचे, काळाणे आदींनी महामार्गावरील अपघातग्रस्तांना रूग्णालयात हलविण्याकरिता मदत करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
iKZFEkOBnHJXTY