विजय उंडे । वीरभूमी- 29-Apr, 2022, 11:35 PM
श्रीगोंदा : गेल्यावर्षी याच दिवसात कोरोनाच्या दुसर्या लाटेने उग्र रूप धारण केले होते. बेड, ऑक्सिजन व उपचारांअभावी रुग्णांच्या नातेवाईकांचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर आमदार, माजी आमदार, कारखान्यांचे अध्यक्ष, सभापती, उपसभापती व अनेक राजकारण्यांकडे सर्वसामान्य जनता तारणहार म्हणून पाहत होती.
भयंकर महामारीत जनतेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु त्यावेळेस या राजकारण्यांना आपल्याच पोशिंद्यांची कीव आली नाही. त्यावेळी सगळे राजकारणी बिळात जाऊन बसले होते. श्रीगोंदा तालुक्यातून अनेक रुग्णांनी काकुळतेने उपचाराअभावी प्राण सोडला. सध्या याच प्राण सोडलेल्या रुग्णांच्या वर्षश्राद्धाची संपूर्ण तालुक्यात लाट आलीय. तालुक्यात रोज असंख्य वर्षश्राध्दांचे मोठमोठे मंडप लावून, महागड्या कीर्तनकारांच्या किर्तनाबरोबर पंचपक्वान्नांच्या जेवणावळी उठत आहेत.
या कार्यक्रमांला झाडून सारे पुढारी हजेरी लावून भर कडाक्याच्या उन्हात मगरीच्या अश्रूंच्या श्रद्धांजली वाहत आहेत. मृताचे पुण्यस्मरण करताना पुढील आडाखे बांधण्यासाठी राजकीय भांडवल करणार नाहीत ते राजकारणी कसले?
पुढील काहीच महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका व विधानसभेची तयारी सुरु झाली आहे. अनेकांनी आमदारकीचे गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी तालुक्यातील पहिल्या फळीचे नेते, त्यांचे व दुसर्याचे संसार हाकणारे दुसर्या फळीतील नेते, तिसर्या फळीतील नेते व या सर्वांचे खूषमस्करे कार्यकर्ते यांची मांदियाळी प्रत्येक कार्यक्रमात प्रकर्षाने जाणवत आहे.
हा सगळा विरोधाभास सर्वसामान्य जनतेच्या नक्कीच लक्षात येत आहे. व जनमानसात राजकीय नेत्यांची प्रतिमा मालिन होऊन कथित नेत्यांविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. या कार्यक्रमात वर्षश्राद्ध परवडले पण अंगाची लाही लाही करणार्या उन्हात नेत्यांची गेलेल्यांप्रती स्तुतीसुमने उधळत श्रद्धांजली नको असे म्हणण्याची वेळ आली आहे.
या सर्व प्रकाराला जनता संतापली आहे. हे कमी की काय आपल्या नेत्यांची हुजरेगिरी करण्याच्या नादात राजकारण्यांनी पोसलेली पिलावळ रोज नेत्यांबरोबरचे श्रद्धांजली वाहतानाचे फोटो समाजमाध्यमावर शेअर करून आपला राजकीय नेताच कसा सर्वसामान्य लोकांच्यात दर्यादिल आहे हे दाखवण्याची चढाओढ लागली आहे.
कोरोना काळात ज्यांचा हॉस्पिटलमध्ये बेमाप खर्च होऊनही धार्मिक प्रथेप्रमाणे व्याजाने पैसे घेऊन वर्षश्राद्ध घालण्याची नामुष्की आली आहे ही बाब तालुक्यातील नेत्यांच्या लक्षात येऊनही कुठल्याच नेत्याने वर्षश्राद्ध कार्यक्रमात दिलदारपणे कुणालाही आर्थिक मदत केली नाही.
सर्वसामान्य जनतेला स्वप्न पडत आहे की आपला नेता वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमात गोरगरिबांना मदत करतोय व यांचीच पिलावळ सोशल मीडियावर आपला नेता गरजू वंचित कुटुंबांना आर्थिक मदत करतोय व सर्वसामान्य जनतेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवतोय. आगामी काळात हेच स्वप्न खरे ठरावे हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा.
Reality.