बोधेगाव । वीरभूमी- 30-Apr, 2022, 08:40 PM
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव शाखेतील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे एटीएम मशीन गॅस कटरच्या साह्याने फोडण्याचा प्रयत्न केला. चोरटे एटीएम फोडत असतांना वीजेच्या मीटरमध्ये शॉर्ट सक्रीट होवून वीजपुरवठा बंद झाल्याने चोरटे पळून गेले. ही घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.
यामुळे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसल्याने एटीएम मधील 14 लाख 95 हजार 900 रुपयांची रक्कम वाचली. बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन चोरटे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत असल्याने शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, रात्रपाळीचा सुरक्षा रक्षक रंगनाथ पांडुरंग वैद्य हे शुक्रवार दि. 29 रोजी रात्री 9 च्या दरम्यान बँकेकडे गस्त घालण्यासाठी आले असता त्यांना बँकेत अंधार दिसला. यामुळे त्यांनी आपल्या हातातील मोबाईलचा टॉर्च सुरु करून पाहिले असता एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे लक्षात आले.
त्यांनी तात्काळ बँक मॅनेजर यांना भ्रमणध्वनीद्वारे याबाबत माहीती दिली. यावर बँक मॅनेजर कल्याण कोल्हे यांनी तातडीने पोलिसांना माहिती देऊन रात्रीच, तालुका विकास अधिकारी भाऊसाहेब चेके, बँकेचे अधिकारी अनिल भुसारी, कोठुळे यांच्यासह घटनास्थळी भेट दिली.
यावेळी त्यांना बँकेत वीजपुरवठा करणारे मीटर लोंबकाळलेले दिसुन आले. त्याचबरोबर एटीएम मशीनच्या मागील बाजुचा डोमकॅमेरा आणि एटीएम मशिनचे समोरील पॅनल काढून कटरच्या सहाय्याने तोडण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात आले.
याबाबत त्यांनी बँकेचे सीसीटीव्ही तपासले असता रात्री 8:20 ते 8:45 च्या दरम्यान दोन तोंड बांधलेल्या व्यक्तीकडुन हे करण्यात आल्याचे आढळले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच रात्रीच सपोनि. आशिष शेळके यांनी पथकांसह घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. एटीएम मशीन फोडण्यात चोरट्यांना अपयश आल्याने एटीएम मशीन मधील 14 लाख 95 हजार 900 रुपयांची रक्कम शाबुत राहीली.
घटनेच्या दुसर्या दिवशी (दि. 30) सकाळी दहाच्या दरम्यान ठसे तज्ञांनी ठसे घेत माहीती घेतली तर साडेदहाच्या दरम्यान शेवगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल यांनी सहाय्यक पोलिस हवालदार भगवान बडधे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश गायकवाड, नेताजी मरकड, संभाजी धायतडक यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र बागुल करत आहेत.
गेल्या 2 ते 3 वर्षापुर्वी बोधेगावातील सेंट्रल बँक फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु सीसीटी अलर्टमुळे तात्काळ पोलिस यंत्रणा उभी राहिल्याने अभय मिळाले. असेच अभय मिळण्यासाठी सहकारी बँकेत गणधारी सुरक्षा रक्षक, सायरण यंत्रणा महत्वाची आहे. ‘म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी’ या म्हणी प्रमाणे सर्वसामान्य जनतेच्या एटीएम मधील 14 लाख 95 हजार 900 रुपयाला लाईटनेच वाचवल्याचे समोर आले.
Comments