औरंगाबाद सभेत 12 अटींचे उल्लंघन
औरंगाबाद । वीरभूमी- 03-May, 2022, 03:47 PM
महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे घेण्यात आलेल्या सभेत पोलिस प्रशासनाने घालून दिलेले नियम व अटी मोडल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद सिटी चौक पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून 16 अटी पैकी 12 अटींचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.
राज ठाकरे यांच्या भाषणाचे सीसीटीव्ही फुटेज व भाषण तपासल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सीटी चौक पोलिस ठाण्यात भादंवि कलम 116, 117 व 153 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे महाराष्ट्र दिनी जाहीर सभा झाली. या सभेसाठी प्रशासनाच्यावतीने 16 अटी घालत परवानगी देण्यात आली होती. मात्र सभेदरम्यान 12 अटींचे पालन केले असल्याचा ठपका ठेवत सभेच्या आयोजकांसह मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर सीटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबादच्या सभेचे पोलिस प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज व भाषण तपासल्यानंतर यामध्ये आवाजाची मर्यादा न पाळणे, भडकाऊ भाषण करणे, नियमापेक्षा जास्त गर्दी करणे असे नियम मोडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हा अहवाल गृहमंत्रालयाला पाठविण्यात आल्यानंतर गृहमंत्रालयाकडून आलेल्या आदेशानंतर सीटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी आक्रमक भुमिका घेतली आहे. भोंगे उतरविण्यासाठी 4 मे रोजीचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.
Comments