जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल । सात वर्ष चालला खटला
अहमदनगर । वीरभूमी- 31-May, 2022, 07:38 PM
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे 21 ऑक्टोबर 2014 रोजी घडलेल्या तिहेरी हत्याकांडाचा आज तब्बल सात वर्षाने निकाल लागला. या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या अशोक दिलीप जाधव, प्रशांत दिलीप जाधव व दिलीप जगन्नाथ जाधव (सर्व रा. जवखेडे खालसा, ता. पाथर्डी) यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्याने तिघांचीही न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.
दि. 21 ऑक्टोबर 2014 रोजी पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील संजय जगन्नाथ जाधव, जयश्री संजय जाधव आणि सुनील संजय जाधव अशा तिघांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांड प्रकरणी प्रशांत दिलीप जाधव यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एकाच कुटुंबातील पती, पत्नी व मुलगा अशी तिघांची हत्या झाल्याने पाथर्डी तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. हत्या झालेले कुटुंब हे दलित असल्याने या हत्याकांडावरून चांगलेच वातावरण तापले होते.
या हत्याकांडातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली होती. ऐन दिवाळी सणाच्या काळातच एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर राज्यभरातील अनेक नेत्यांनी जवखेडे खालसा येथे भेट दिली होती.
पोलिसांनी तपास करत असतांना या हत्याकांडप्रकरणी मयताच्या नातलगांनाच आरोपी करुन अटक करण्यात आली. पोलिसांनी अटक केलेल्यामध्ये फिर्यादीलाच आरोपी केल्याने या निकालाकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
आज मंगळवारी दि. 31 मे रोजी प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यलागड्डा यांच्या न्यायालयात हा निकाल दिला. या हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेले अशोक दिलीप जाधव, प्रशांत दिलीप जाधव व दिलीप जगन्नाथ जाधव (सर्व रा. जवखेडे खालसा, ता. पाथर्डी) यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्याने न्यायालयाने या तिनही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
zAvuQcLORX