कर्जत-जामखेडमध्ये जल्लोष । आ. रोहित पवारांना शह देण्यासाठी भाजपाचा निर्णय
डॉ. अफरोजखान पठाण । वीरभूमी - 08-Jun, 2022, 12:40 PM
कर्जत : माजीमंत्री राम शिंदे यांना भाजपाकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून कर्जत शहर आणि तालुक्यात शिंदे यांच्या उमेदवारीचे स्वागत करण्यात आले. राम शिंदे यांनी सकाळी आपल्या सोशल मीडियावर मैं लौटकर वापस आऊगा या आशयाचे स्टेटस ठेवले होते. ते संध्याकाळी तंतोतंत खरे ठरल्याने स्थानिक भाजपा नेत्यांमध्ये नवचैत्यन संचारले आहे.
माजीमंत्री राम शिंदे हे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू शिलेदार म्हणून गणले जाते. राम शिंदे यांना विधानसभेत आ रोहित पवार यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांनतर कर्जत-जामखेड तालुक्यातील स्थानिक भाजपाच्या पदाधिकार्यांनी राम शिंदेची साथ सोडत राष्ट्रवादीशी घरोबा केला होता. मात्र राम शिंदे यांनी न खचता आपले राजकारण सुरूच ठेवले होते.
मतदारसंघातील प्रश्नावर त्यांनी आ रोहित पवार यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करीत आपली राजकीय भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली होती. याकामी त्यांनी दुसर्या फळीतील राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना सोबत घेत आपले राजकीय बस्तान कायम राखण्यात यश मिळवले होते.
जिल्ह्यातील भाजपाच्या नेत्यांनी यासह अहमदनगर जिल्ह्यातील आमदारांनी शिंदे यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची मागणी वरिष्ठ नेतृत्वाकडे केली होती. याच अनुषंगाने राज्यसभेसाठी देखील राम शिंदेचे नाव चर्चेत आले होते. मात्र आज विधान परिषदेसाठी त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याने कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपाच्या नेत्यांमधून स्वागत करण्यात आले आहे. बुधवार, दि 8 रोजी सकाळी 11 वाजता राम शिंदे त्यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करणार असल्याची माहिती भाजपाच्या संपर्क कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे.
राम शिंदेचे स्टेटस खरे ठरले
मंगळवारी सकाळी माजीमंत्री राम शिंदे यांनी सोशल मीडियावर मेरा पाणी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बना लेना, मैं समुंदर हु, लौटकर वापस आऊंगा या आशयाचे स्टेट्स ठेवले होते. संध्याकाळी त्यांची विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्याने मैं वापस आऊगा हे खरे ठरले असल्याची प्रतिक्रिया भाजपा कार्यकर्त्यानी दिली.
Comments